- परिसंवादात सडेतोड उत्तरे : शाळकरी मुलांचा उत्स्फूर्त सहभाग
लोणावळा – लोणावळा नगरपरिषद आणि ऑक्झिलियम कॉंव्हेंट हायस्कूल यांच्या वतीने “प्रदूषण मुक्त लोणावळा’ या विषयावर एका परिसंवादाचे तसेच पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. लोणावळा शहरातील वेगवेगळ्या शाळेतील मुलांनी या परिसंवादात भाग घेत आपली मते सडेतोडपणे मांडली.
नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 5) झालेल्या या परिसंवादात देण्यात आलेल्या वातावरणातील बदल, स्वच्छता, स्वच्छतेमधील शाळेचा सहभाग, प्लॅस्टिकचा वापर कमी करणे, प्रदूषण, कचऱ्याचे वर्गीकरण, वर्गीकरणाचे मार्ग, वृक्ष लागवड, पर्यावरणपूरक सण, प्रदूषण मुक्त हवा, जागतिक तापमान वाढ आणि खत निर्मिती यासारख्या विषयांवर सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपापली मत मांडली. यामध्ये प्रामुख्याने वाहनांचा वापर कमी करणे, सायकलचा वापर वाढविणे, प्रदूषणात वाढ करणाऱ्या वाहनांवर बंदी आणणे अशा प्रकारच्या सूचनांचा समावेश होता.
शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणावर देखील विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली. सोबतच स्वच्छता प्रणाली व्यवस्थित बसवून कायद्याची कडक अंमलबजावणी करून घेतली गेली पाहिजे, असे देखील विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. तसेच काही अभिनव अशा नवनवीन संकल्पना देखील यावेळी मांडल्या. मुख्याधिकारी सचिन पवार यांनी स्वतः या स्पर्धेचे निवेदन करीत विद्यार्थ्यांची मत जाणून घेतली.
या परिसंवादाला उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, नगरसेवक देविदास कडू, नगरसेविका आरोही तळेगावकर, सिंधू परदेशी, अपर्णा बुटाला, अंजली कडू, कल्पना आखाडे, उपमुख्याधिकारी मनोहर खाडे, ऑक्झिलीयम कॉंव्हेंट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शीला फुटाडो आदी उपस्थित होते.
स्वच्छता ही एक मानसिकता…
नगराध्यक्षा जाधव व मुख्याधिकारी पवार यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वच्छता ही एक मानसिकता आहे. मानसिकता बदलली की स्वच्छता आपोआप होते असे सांगत मुख्याधिकारी सचिन पवार यांनी “प्रदूषण मुक्त लोणावळा’ या संकल्पनेवर सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. ऑक्झिलीयम कॉंव्हेंट हायस्कूल, भोंडे हायस्कूल, व्हीपीएस हायस्कूल, डॉन बॉस्को, रायवूड इंटरनॅशनल, कैवल्यधाम विद्यानिकेतन, शांती सदन हायस्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परिसंवादात सहभाग घेतला होता.