- दोन्ही मयत चालक तामिळनाडूचे रहिवासी
लोणावळा –पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर शुक्रवारी(दि.14) रात्री एक किमी अंतरात दोन अपघात झाले. या दोन्ही अपघातांमध्ये चालकांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही वाहनांचे मयत चालक तामिळनाडू राज्याचे रहिवासी होते.
शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक्सप्रेस वेवरुन मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक (क्र. टीएन 31बीबी 5730) हा खोपोली पोलीस स्टेशन हद्दीतील किमी 39 येथे आला असता, उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने समोर जाणारी एक कार व ट्रक ला धडक दिली. या अपघातात गाडी पलटी झाली व गाडीतील साबणाचे बॉक्स खाली पडले, त्याखाली अडकल्याने चालक रमेश (रा. तमिळनाडू) याचा मृत्यू झाला.
दुसरा अपघात या अपघातस्थळापासून केवळ एक किमी अंतरावर म्हणजे किमी 38.500 येथे पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पुणे मुंबई लेनवर झाला. यामध्ये ट्रक (क्र. टीएन 77 डी 9826) वरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने समोरील ट्रकला धडक दिली. यामध्ये चालक आनडूरोस अँथनी (रा. तमिळनाडू) हा केबिनमध्ये आडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर क्लिनर व्यंकट सुब्रमण्याम हा किरकोळ जखमी झाला आहे.
या दोन्ही अपघातांमुळे एक्सप्रेस वेवरील वाहतूककोंडी काही काळासाठी विस्कळीत झाली होती. आयआरबी पेट्रोलिंग, बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स व लोकमान्य रुग्णसेवा या यंत्रणांनी दोन्ही घटनांमध्ये अपघातग्रस्तांना मदत केली.