पुणे : गेल्या दीड वर्ष कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य विभागातील कर्मचारी जीवाची पर्वा न करता आपली जबाबदारी चोख बजावत आहेत. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून त्यांना वेतन वाढ देण्यात यावी ही मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी केली होती. या मागणीला आज स्थायी समितीच्या बैठकीत एकमताने मान्यता देण्यात आली.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाची साथ रोखण्यासाठी महापालिका प्रशासन लढत आहे. या लढाईत आरोग्य विभागाच्या प्रमुखापासून अगदी सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच यंत्रणा जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत होती. त्यात अनेक कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला तर अनेकांना गंभीर स्वरूपाच्या कोरोनाची लागण झाली. त्यांच्या या कामाची दखल घेऊन आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना खासबाब म्हणून एक वेतनवाढ देण्यात यावी असा प्रस्ताव नगरसेविका पाटील यांनी मांडला होता. त्यात एकमताने मंजुरी दिली असल्याचे माहिती अध्यक्ष स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
या पूर्वी सन २००८ मध्ये पुणे शहरातील बालेवाडी येथे कॉमन वेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा पुणे मनपाच्या सर्व व्यवस्थापन टीम ने चांगली कामगिरी केल्या बद्दल त्यांना खासबाब वेतनवाढ देण्यात आली होती. त्याच धर्तीवर आरोग्य विभाग प्रमुख ते शेवटच्या स्तरातील कर्मचारी यांना खासबाब म्हणून वेतनवाढ देण्यात यावी अशी मागणी नगरसेविका पाटील यांनी केली होती.