सातारा, दि. 2 (प्रतिनिधी)- अबुधावी येथे झालेल्या स्पेशल ऑलिंपिक पॉवर लिफ्टिंग विभागात पदकाची लयलूट केलेल्या मनाली शेळके, पुणे (1 गोल्ड व 3 ब्रॉंझ) व आदित्य डोंबले, कोल्हापूर ( 4 सिल्व्हर यांचा सत्कार सोहळा आनंद परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, छ. प्रतापसिंह महाराज (थो.) नगरवाचनालय व सक्षम, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने पाठक हॉल, नगर वाचनालय येथे शनिवार, दि. 30 रोजी संपन्न झाला.
या गौरव समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिज्ञासा विशेष शाळा, कोल्हापूर येथील स्पेशल ऑलिंपिग मार्गदर्शक विशाल दीक्षित व स्पेशल ऑलिंपिकच्या झोनल इन्चार्ज सौ. स्मिता दीक्षित यावेळी उपस्थित होत्या. गौरव समारंभाची मानबिंदू असलेली मनाली शेळके व मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. गौरवपत्र व भेटवस्तूंसोबत सातारी कंदी पेढ्यांचा हार घालून, त्यांच्या आई-वडिलांसमवेत या मुलांचे कौतुक करण्यात आले. याप्रसंगी बोलताना स्पेशल ऑलिंपिक क्षेत्रात काम करणाऱ्या श्री व सौ. दीक्षित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्मिता दीक्षित यांनी विशेष मुलांमधील क्षमता शोधून त्यांना विशेष प्रशिक्षण दिल्यास त्यांच्याकडून देखील अशा प्रकारची चांगली कामगिरी घडते असे प्रतिपादन केले.
सूत्रसंचालन सौ. वैदेही कुलकर्णी यांनी केले. आजचा गौरव सोहळा म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असल्याचे प्रतिपादन करुन आभार प्रदर्शन देवधर सरांनी केले. या कार्यक्रमास आनंद परिवारचे विश्वस्त, पालक, विशेष मुले, सेवक वर्ग तसेच सक्षमचे कार्यकर्ते व कौतुक पाहण्यास आलेले सातारचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांची मनाली (सेलिब्रिटी) बरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती. आज एक विशेष मुल खरोखरच विशेष झाले होते, खरोखर सेलिब्रिटी झाले होते.