सशांच्या शर्यतीत आघाडीचे कासव कोठे?

पक्ष प्रवेश सोहळ्यानंतर जिल्ह्यात चुरशीच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रीत

राजेंद्र वारघडे

पाबळ- अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप- शिवसेनेत इनकमिंगची संख्या वाढत आहे. युतीच्या शर्यतीत कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कासव पुढे जाणार काय, याची चर्चा आता जिल्ह्यात झडत आहे. पक्ष प्रवेशातील उलथापालथीचा फायदा नेमका कोणाला होणार, याबाबत तर्क वितर्क सुरु आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संस्थानातील आमदार, तसेच तगड्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

शिवसेना आदित्य ठाकरे यांचे राजकीय पक्के पुनर्वसन करताना , मुख्य मंत्री पदाची कामना ठेवत, महानगरपालिका कब्जात ठेवण्यासाठी सावध पावले टाकत आहे. त्याच वेळी कोन्ग्रेस राष्ट्रवादीचे नेते त्यांचे शिलेदार पक्षांतर करत असताना, ते रोखण्यासाठी खास आग्रह’ न करताना दिसत आहेत .यामागे कॉंग्रेस चे मनसुबे काहीही असोत ,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा मात्र सशाच्या शर्यतीत आपले कासव कसे पुढे न्यायचे याचे मनसुबे रचित असावेत’ अशीही चर्चा राजकीय धुरीणामध्ये सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीच्या विजयातून प्रचंड आत्मविश्वास वाढलेल्या भाजपचे लक्ष्य आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीसह तळागाळात सत्ता प्रस्थापित करण्याकडे दिसत आहे. विधानसभेचे बहुमत गाठण्यासाठी दोन ते चार मोठे मासे गळाला लावण्यासाठी प्रयत्न झाले. सुरवातीला अवघड वाटणारे हे काम मात्र सोपे झाले. त्यांना गरजेपेक्षा जास्त उमेदवार प्रवेशासाठी मिळत असल्याचे चित्र आहे. यात “करायला गेले एक आणि झाले भलतेच’ असा अनुभव येत असल्याने “स्वर्ग दोन बोटे’ उरल्याचा अनुभव भाजप घेत आहे.
हा परिणाम दोन्ही कॉंग्रेसवर होत नसल्याची बाब नुकत्याच मुंबईत हर्षवर्धन पाटील यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमातून पुढे आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन्ही कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी कोपरखळीची भाषणे करून याला दुजोरा दिला आहे. सर्वात महत्वाचा धक्‍का राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजारी असूनही उपस्थित राहून दिला आहे. मी दिल्लीत नसून जागेवर असल्याचा संदेशही दिला आहे. हा पवित्रा मात्र पक्ष सोडणाऱ्यांना संभ्रमात टाकणारा, नवोदित उमेदवारांना उत्साह देणारा तर विरोधकांना चकवा देणारा ठरू शकतो, अशी चर्चा होत आहे. भाजपची घाई, शिवसेनेचा संयम हा कॉंग्रेसला फायद्यात नेणारा ठरू शकतो, अशी चर्चा मूळ धरू लागली आहे.

राजकारणात काहीही घडू शकते, याची प्रचिती विरोधाभास निर्माण करणारी दिसून येत आहे. एकेकाळी नियमाने चालणारा भाजप फोडाफोडीचे राजकारणात रमू लागला आहे. युती करून डरकाळी म्यान केलेली शिवसेना संयम दाखवत आहे. त्याचवेळी शरद पवार यांना विरोध करणारी कॉंग्रेस शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारण्याच्या मन;स्थितीत आली आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादीतील गर्दी भाजपात गेली आहे तर कॉंग्रेसची दुसरी फळी व तरुण पिढी उमेदवारीसाठी पुढे सरसावत आहे, अशा परिस्थितीत मतदारांना गृहीत धरून सत्ताधारी सत्ता आमचीच येणार अशा डरकाळ्या फोडत आहे.

या घडामोडीत सत्ताधारी मागच्याप्रमाने वेगळे लढले तर आयाराम सामावतील, असा विचार पुढे येण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी मर्यादित गर्दीतून उमेदवार निवडण्याचे सोपे काम दोन्ही कॉंग्रेसला फायदेशीर होत आहे. या परिस्थितीत खासदार कोल्हेसारखे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार दोन्ही कॉंग्रेस बाहेर काढण्याची दाट शक्‍यता आहे. गोंधळलेले सत्ताधारी आयाराम गयारामांचे पुनर्वसन कसे करणार, हा खरा प्रश्‍न निवडणुकांच्या सलामीला जोर धरणार आहे. अर्धी लढाई तिकीट वाटपात जिंकली जाते, असे म्हणतात. मात्र, यावेळी दोन्ही कॉंग्रेसला तिकीट वाटपाचा त्रास कमी होणार आहे. सत्ताधारी उमेदवारी वाटपात गुरफटणार असल्याने ही अर्धी लढाई सध्यातरी कॉंग्रेसला फायद्यात पडणार असल्याचे सध्या दिसत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.