शिरूर शहरात भरदिवसा घरफोडी

तीस किलोच्या तिजोरीसह साडेपाच लाखांवर चोरट्यांचा डल्ला

शिरूर – मुंबई बाजार शिरूर येथील साई भागीरथी इमारतीत चौथ्या मजल्यावरील बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील तीस किलो वजनाच्या तिजोरीसह सोन्या चांदीचे दागिने, 52 हजारांची रोख रक्कम, पासपोर्ट, कॉलेजचे प्रमाणपत्र असा पाच लाख 67 हजारांचा मुद्देमाल भरदिवसा चोरून नेला आहे.

शिरूर शहरात भर बाजारपेठत महिन्यात दुसरी जबरी घरफोडी झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना 25 जून रोजी सकाळी अकरा ते रात्री अकराच्या दरम्यान घडली आहे. याबाबत अतीक इब्राहिम शेख (रा. साई भागीरथी मुंबई बाजार, शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत शिरूर पोलिसानी दिलेली माहिती अशी अतिक शेख हे पुणे येथे महिंद्रा ब्रिस्टल कॉन येथे कामाला असून, ते शिरूर येथील साई भागीरथी मुंबई बाजार येथे पत्नी, मुलगा, मुलगी
यांच्यासह राहतात.

25 जून रोजी सकाळी आठ वाजता स्वतः मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. एक मुलगा शाळेत गेला सकाळी अकरा वाजता शाळेतून आल्यानंतर पत्नी मेहरनाझ दोन्ही मुलासह जवळच मुंबई बाजार येथे माहेरी गेली. सायंकाळी पत्नी हिस फोन करून मी रात्री अकरा वाजता येतो असे सांगितल्याने मी येणार असल्याने पत्नी रात्री अकरा वाजता पुन्हा घरी आली तेव्हा तिला घराच्या दरवाजाची कडी तुटलेली दिसली व दरवाजा उघडा दिसला. घरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. जवळच राहणारे वडील व भाऊ यांना बोलावून घेऊन तिजोरी पाहिली असता ती कपाटात आढळून
आली नाही.

या तिजोरीत ठेवलेले चार तोळे सहा ग्रॅमचे सोन्याचे नेकलेस, दोन तोळ्यांचे सोन्याचे नेकलेस, चार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, दोन तोळ्यांचे बांगड्या, आठ ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या रिंगा, एक तोळे, पाच ग्रम सोन्याचे झुबे, एक तोळ्याचे झुबके, दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी, 22 ग्रॅम चांदीचे अकरा दिवे, दहा ग्रॅम हातातील चांदीचा कडे, रोख 52 हजार रूपये, तीस किलो वजनाची लोखंडी गोदरेज कंपनीची तिजोरी, बीएससी सर्टिफिकेट, मार्कशीट, दोन बोनाफाइड, पाच पासपोर्ट, प्रॉपर्टीचे पेपर, चेकबुक, सोने खरेदीचे बिले असा एकूण पाच लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.