शाळा सुरू होण्यापूर्वीच पुण्यात 17 जण “करोना पॉझिटिव्ह’

5,671 जणांच्या तपासणी अहवालातून निदान

पुणे – जिल्ह्यातील शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत 5 हजार 671 जणांची “आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात आली आहे. त्यातील 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

 

मुंबईच्या धर्तीवर पुणे महापालिकेने शहरातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, जिल्ह्यातील शाळा बंदचा निर्णय अद्याप झालेला नाही. गेल्या पाच दिवसांपासून शहरातील करोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने हा निर्णय घेतला. त्याचबरोबर ग्रामीण भागातही बाधितांची संख्या ही वाढतीच आहे. तरी देखील जिल्ह्यातील शाळा बंदचा निर्णय अद्याप झालेला नाही. एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे जिल्ह्यात शिक्षकच बाधित सापडत आहे. 22 हजार शिक्षकांमधून आतापर्यंत केवळ साडेपाच हजार म्हणजेच 26 टक्के शिक्षकांची तपासणी पूर्ण झाली. अजून 74 टक्के शिक्षकांची तपासणी बाकी असून, आजपासून शाळा सुरू होत आहे. त्यामुळे उरलेल्या शिक्षकांचे काय? त्यामध्ये कोणी बाधित असल्यास जबाबदार कोण? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

 

आत्तापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये तेरापैकी सात तालुक्यांत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये दौंड तालुक्यात सर्वाधिक 945 शिक्षकांची तपासणी केली असून, त्यामध्ये चार तर इंदापूर आणि पुरंदरमध्ये देखील प्रत्येकी चार जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

 

शिरूरमध्ये दोन, बारामती, भोर, वेल्हा तालुक्यातील प्रत्येक एकाला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुळशी तालुक्यात सर्वांत कमी केवळ 70 शिक्षकांनी चाचणी करून घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.