राज्यभरात कुठे ‘शाळा’ सुरु होणार कुठे नाही याबद्दल ‘संभ्रम’

मुंबई – सरकारच्या निर्णयानंतरही राज्यभरात कुठे शाळा सुरु होणार, कुठे नाही याबद्दल अजूनही संभ्रम दिसून येतो आहे. शासनाने निर्देश दिल्यानंतरही करोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक मधल्या शाळा सुरू होणार नसल्याचे तिथल्या स्थानिक प्रशासनांनी स्पष्ट केले आहे.

सांगली, वाशिम, परभणी, जालना, आणि परभणी जिल्ह्यात मात्र नववी ते बारावीचे वर्ग उद्यापासून सुरू होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये येत्या 26 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

मात्र नागपूर मनपा कार्यक्षेत्रातल्या शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद राहतील असे पालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी स्पष्ट केले आहे. धुळे जिल्ह्यात उद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

शाळा सुरू करण्याच्या तयारीच्यादृष्टीने शिक्षकांच्या करोना चाचण्या, वर्गांचे निर्जंतुकीकरण, नियमांची आखणी अशी पुर्वतयारी करण्यात आली आहे. शिक्षकांच्या करोना चाचण्या केल्यानंतर काही शिक्षकांना करोनाची लागण झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. वर्धा जिल्ह्यात 24 तर जालना जिल्ह्यात 13, सांगलीत 7 शिक्षकांना करोनाची लागण झाल्याचं निदान झाले. दरम्यान करोना चाचणी अनिवार्य केल्याने अनेक आरटीपीसीआर चाचणी केंद्रांवर गर्दी झाली आहे.

महाविद्यालये सुरू करण्याविषयी अद्याप निर्णय – उदय सामंत
शाळा सुरू करायचा निर्णय सारासार विचार करूनच घ्यावा. सरसकट निर्णय करून चालणार नाही, असा सल्ला विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर शाळा सुरू करायाच्या की नाही या विषयी निर्णय घ्यायच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.

मात्र महाविद्यालये अद्याप सुरू करायची की नाही या विषयी अद्याप तरी निर्णय झालेला नसल्याचे स्पष्टीकरणही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोलापुरात दिले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.