सिनेमा करायचा म्हणजे नेहमी काही तरी वेगळा आणि ताजा विषय शोधायला लागतो. ज्यामध्ये काही तरी नाट्यमय घडामोड घडलेली असते अशी घटना सिनेमाचा विषय ठरू शकते. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा विषय मीडियामध्ये गाजतो आहे. त्याच्या आत्महत्येच्या तपासाच्या निमित्ताने रिया चक्रवर्तीचे नावही पुढे आले आणि गेल्या महिन्याभरापासून रिया चक्रवर्तीचे नाव माध्यमांमध्ये गाजते आहे.
सुशांतच्या आत्महत्येच्या विषयावरूनही काही निर्मात्यांनी सिनेमा करण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. त्या संभाव्य सिनेमाचे पोस्टरही तयार झाले आहेत. आता रिया चक्रवर्तीच्या बायोपिकचीही चर्चा निर्मात्यांमध्ये सुरू झाली आहे. बॉलीवूडमध्ये रिया चक्रवर्तीबद्दल खूपच सहानुभूती व्यक्त केली जाऊ लागली आहे. या सहानुभूतीबरोबरच रियाच्या आयुष्यातील काही उतार-चढावांचा आलेखही अभ्यासला जाऊ लागला आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र करून रिया चक्रवर्तीचा बायोपिक करण्याची तयारी काही निर्मात्यांनी सुरू केली आहे. या संदर्भात रियाबरोबर चर्चा करण्यासाठी चांगल्या संधीची वाट काही निर्माते बघत आहेत. रिया एक पुस्तकही लिहीण्याचा विचार करत आहे. त्यात ती आपली बाजू स्पष्टपणे मांडण्याचा विचार करते आहे.