राष्ट्रवादी जोमात तर युती कोमात

वाई-महाबळेश्‍वर-खंडाळा मतदार संघातील परिस्थिती
मेणवली, दि. 7 (प्रतिनिधी) –  किसनवीर सह. कारखाना विद्यमान चेअरमन व माजी आमदार मदन भोसलेंनी भाजपचे कमळ हातात घेवूनही बहुतांशी कॉंग्रेस समर्थक हातात कमळ घेण्यास धजावत नसल्याने लोकसभेच्या रणांगणात अजूनही युतीची हवा वेग घेताना दिसत नाही तर वाई तालुक्‍यात आजही आमदार मकरंद पाटलांच्या राष्ट्रवादीची हवा अतिवेगाने वाहत असल्याचे चित्र विधानसभा मतदारसंघात सर्वत्र पहायला मिळत असल्याने राष्ट्रवादी जोमात अन्‌ युती कोमात असल्याची चर्चा जनतेसह कार्यकर्त्यांत रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी मदनदादा भोसलेंनी भाजपचे कमळ अचानक हातात घेतल्याचे कॉंग्रेसच्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना रुचलेले नाही. किसनवीरआबा, यशवंतराव चव्हाण यांच्या साथीने कॉंग्रेस पक्षाची विचारधारा महाराष्ट्र व सातारा जिल्ह्यासह वाई तालुक्‍यात रुजवण्यात दोन पिढ्यांनी हयात घालवलेल्या भुईंजच्या एकनिष्ठ भोसले घराण्याने अचानक भाजपचे कमळ आपल्या पुरोगामी हातात का घेतले? कशासाठी घेतले? याचे कोडे कोणालाच उलगडत नाही.
सहकार शिरोमणी म्हणून नावारूपाला येवू पाहणाऱ्या कॉंग्रेस विचाराच्या मुशीत घडलेल्या मदनदादा भोसलेंनी दस्तुरखुद्द भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत किसनवीर आबा,प्रतापराव भोसले यांनी जांबच्या माळावर कष्टाने उभारलेल्या सहकार मंदिराच्या आवारात कमळाचा झेंडा फडकवल्याने वाई तालुक्‍यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आश्‍चर्य व्यक्त केले जात असून किसनवीर आबा, प्रताप भोसले यांनी जनतेच्या सहकार्यातून उभारलेल्या पुरोगामी विचारांना ठेच लागल्याने सांग माझा काय घडला गुन्हा अशी हाक जांबच्या माळावरील सहकार मंदिरातून ऐकायला मिळत असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरात सहकाराक्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या किसनवीरच्या नेतृत्वाने पुरोगामी विचारांचा हात सोडून हिंदुत्वाचे कमळ जांबच्या माळावरील सहकार तळ्यात का लावले, याचा शोध अनेकजण घेताना दिसत आहेत तर सहकारच्या तळ्यात लावलेले कमळ बहरणार का? कमळाच्या रोपाला दादांचे कार्यकर्ते पाणी घालणार का? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
भाजपवासी मदनदादांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेवून त्यांची मते अजमावण्यास सुरवात केली असली तरी कॉंग्रेसच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते भाजप विचाराच्या कार्यकर्त्यांशी कितपत जुळवून घेणार? हा चर्चेचा विषय ठरला आहे तर भाजपचे कार्यकर्ते कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना कितपत सामावून घेणार हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. नेत्यांची मने जुळली तरी नेत्यासाठी भांडलेली कार्यकर्त्यांची मने अजून जुळली जात नसल्याने घड्याळाचे काटे मात्र जोरात फिरू लागले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.