मुंबईत बलात्काराच्या घटनांमध्ये 51 टक्‍क्‍यांनी वाढ

बाल लैंगिक अत्याचारात तब्बल 69 टक्‍क्‍यांनी वाढ

मुंबई : मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा लेखाजोखा प्रजा फाऊंडेशन या संस्थेने समोर आणला आहे. या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. यात महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 2014 ते 2019 पर्यंतचा हा अहवाल असून बलात्कार, महिलांशी छेडछाड आणि लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळपास 51 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबई शहरात गेल्या काही वर्षांची सरासरी पहिली तर लहान मुलांवर झालेल्या अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये जवळपास 69 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक म्हणजे या सगळ्या प्रकरणांपैकी 90 टक्के प्रकरणांमध्ये लहान मुलांवर अत्याचार करणारी व्यक्ती ही त्यांच्या परिचयाची असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मागील पाच वर्षात महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराची एकूण 784 प्रकरणे नोंद झाली आहेत.
यात लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांची 540 प्रकरणे आहेत. यात 90 टक्के अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये आरोपी व्यक्ती ही पीडितांच्या ओळखीची आहे.

प्रजा फाऊंडेशनने समोर आणलेल्या माहितीनंतर मुंबईत महिला आणि लहान मुले खरच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई शहरात 2017 साली दाखल झालेल्या 1 लाख 5 हजार 404 प्रकरणांपैकी जवळपास 70 टक्के प्रकरणे वर्षअखेरपर्यंत प्रलंबित होती, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणांचा तपास करणारी यंत्रणा कमी पडत असल्याचे प्रजाच्या अहवालात म्हटले आहे.

जुलै 2019 पर्यंतच्या माहितीनुसार या प्रकरणांचा तपास करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकांची 41 टक्के पदे रिक्त आहेत. तर पोलीस निरीक्षकांची 28 टक्के पदे रिक्त असल्याची माहिती प्रजाने आपल्या अहवालात मांडली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)