कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी आज बैठक

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीने आपला विधिमंडळ गटनेता जाहीर केला असला तरी अद्याप कॉंग्रेसकडून मात्र विधिमंडळ पक्षनेत्याची निवड झालेली नाही. सत्तास्थापनेबाबत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर विधिमंडळ गटनेतेपदाबाबत कॉंग्रेसमध्ये एकमत झाले असून उद्या, शुक्रवारी दुपारी एक वाजता बैठक होणार आहे.

शिवसेनेने विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे, भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस, तर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. मात्र कॉंग्रेसकडून विधिमंडळ गटनेत्याची निवड करण्यात आली नव्हती.

विधिमंडळ गटनेता कुणाला नेमायचे याबाबत कॉंग्रेस नेत्यांमध्ये मतभिन्नता होते. नुकत्याच झालेल्या दिल्लीतील बैठकीत कॉंग्रेस पक्षाचा विधिमंडळ गटनेता निवडीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यानुसार उद्या, शुक्रवारी दुपारी 1 वाजता कॉग्रेसची बैठक होत आहे. मात्र, उद्या होणाऱ्या बैठकीत विधिमंडळ गटनेता निवडण्याऐवजी तो निवडण्याचे सर्वाधिकार हायकमांड सोनिया गांधी यांना दिले जातील. त्यानंतर सोनिया गांधी या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेत्याचे नाव जाहिर करतील, अशी माहिती कॉंग्रेसच्या सुत्रांनी दिली.

कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु, प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या यंदाच्या विधानसभा निवडणूकीत पक्षाला मिळालेल्या यशामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.