मुंबई : मुंबईत संचारबंदी लागू असतानाही शिवडी परिसरात पार्किंगच्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारांसोबत झालेल्या भांडणात या तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले.
शिवडी क्रॉस रोड येथील महापालिका चाळ नंबर 46 च्या गल्लीत पार्किंगवरुन अदनान पटेल याचे शेजारील करीम शेख यांच्याशी वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, अदनानचे दोघे भाऊ शाहीद आणि साहील हे दोघेही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर करीमचे देखील आई वडील आणि भाऊ घटनास्थळी आले.
यावेळी दोन्ही कुटुंबांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर याचे रुपांतर हाणामारीत झाले. ही मारहाण सुरू असताना करीम युसूफ याने त्याच्या जवळील चाकूने अदनान, शाहीद आणि साहीलवर सपासप वार केले. यात शाहीद गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचाराकरता जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या हत्येप्रकरणी शिवडी पोलिसांनी करीम शेख, युसूफ शेख, मिनाज शेख आणि मेहराज शेख या चौघांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.