भीमापाटस’कडून ऊस बिलाची रक्कम बॅंक खात्यात जमा

कारखान्याचे कार्यकारी संचालक निभे यांची माहिती 

दौंड – दौंड तालुक्‍यातील सभासदांच्या मालकीचा असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2018-19 मधील ऊस दराच्या पहिल्या हप्त्यापोटी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर प्रतिटन रुपये दोन हजार प्रमाणे रक्कम जमा केली आहे. तसेच, गेल्या हंगामातील उसाला प्रति टन रुपये 200 प्रमाणे होणाऱ्या रकमेचा धनादेश सोमवारपासून (दि.23) अदा करीत असल्याची माहिती भीमा पाटस साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब निभे यांनी दिली. तसेच, कामगारांची देणी ठरल्यानुसार आदा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

साखरेच्या दरातील सततच्या घसरणीमुळे ऊस दरावर परिणाम होत आहे. त्यावर मात करून आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक दर देण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्याच्या दुष्काळातही कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे नोंदलेल्या संपूर्ण उसाचे गाळप आपण केले आहे. कामगार आणि सभासद शेतकऱ्यांचे प्रतिकूल स्थितीत चांगले सहकार्य मिळाले. तसेच, चालू हंगामात ज्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपल्या साखर कारखान्याला ऊस घातला, अशा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर दोन हजार रुपये प्रति टन प्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे. चालू गळीत हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील रक्कमही लवकरच बॅंक खात्यावर जमा करण्याचे नियोजन असल्याचे निभे यांनी सांगितले.

कार्यकारी संचालक निभे म्हणाले की, बॅंकेतील तांत्रिक अडचणीमुळे एखादा दुसरा दिवस इकडे तिकडे होऊ शकतो. कामगारांची राहिलेली देणी व सेवानिवृत्त कामगारांची देणीही कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्या झालेल्या चर्चेनुसार देण्यास सुरुवात केली आहे. सेवानिवृत्त कामगारांचा पहिला हप्ता बॅंक खात्यावर जमा केला आहे. कामगार देणी ठरल्यानुसार आदा करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.