बारामतीच्या मैदानात इंदापूरची आकडेमोड

कोणाच्या पारड्यात मत”दान’ करणार ? : कॉंग्रेस- भाजपची गळाभेट फोल ठरली

पुणे- बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी- भाजपने कंबर कसली आहे. मतांची जुळवाजुळव आणि मताधिक्‍याचे गणित पुन्हा इंदापूर येथे येत असल्यामुळे या आखाड्यात इंदापूरची आकडेमोड केली जात आहे. गेल्या आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतल्यानंतर बारामतीच्या मैदानात इंदापूरला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, खडकवासला, बारामती या सहा विधानसभेचा समावेश आहे. या मतदारसंघात तीन विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. मात्र, तीन विधानसभा मतदारसंघात दोन कॉंग्रेस, एक शिवसेना, एक रासप असे वर्चस्व प्रस्थापित आहे. वास्तविक बारामती, पुरंदर, इंदापूर, दौंडमध्ये राष्ट्रवादी आपले अस्तित्व टिकवून असताना त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्वी एकतर्फी वाटणारी बारामतीचे मैदान आता निणार्यक वळणावर पोहचले आहे. 2014 मधील निवडणुकीत रासपचे महादेव जानकर यांनी लक्षवेधी झुंज दिल्यानंतर पवार विरोधकांना आयतेच बळ मिळाले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पाच वर्षे टिकून राहिला आहे.

घटते मताधिक्‍य हे राष्ट्रवादीला अडचणीत आणणार, असे दिसत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी पाच वर्षे मतदारांशी संवाद साधला. ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र, 25 वर्षांच्या मागील राजकीय इतिहासात डोकावून पाहिले असता भोरचे संस्थान, इंदापूर, दौंडचे संस्थान हे पवार घराणेशाहीला विरोध करणारे नेतृत्व म्हणून उदयाला आले आहे. यात आमदार संग्राम थोपटे, आमदार राहुल कुल, राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा समावेश आहे. ही आकडेमोड पवार विरोधकांना रसद पुरविणारी ठरत आहे. पवारविरोधकांमध्ये खदखदणारा असंतोष 2014 मध्ये उफाळून आला. त्यावेळी दौंड, पुरंदर, खडकवासला मतदारसंघातून रसद मिळाली. त्यामुळे विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दौंडच्या कुल घराण्यातील कांचन कुल यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली आहे. त्यात विजयासाठी गोळाबेरीज करताना मताधिक्‍याचे पारडे असमतोल होत आहे. त्यामुळे फिरून फिरून पुन्हा इंदापूरकडे सर्वांचे लक्ष जात आहे. यात भाजपने इंदापूरकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या आठवड्यात काही दिवसांपूर्वी डेरेदाखल झालेले मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेटच्या नावाखाली बावड्यातील रत्नाई निवासस्थान गाठले. त्यामुळे मोहिते पाटील आणि इंदापूरचे पाटील यांच्यातील भेटीमुळे तर्क- वितर्कांना उधाण आले. मात्र, हे उधाण अफवा आणि चर्चेत विरून गेले.

  • 21 हजारांचे मताधिक्‍य घटविण्याचेच आव्हान
    इंदापूर तालुक्‍यातून गतवेळी खासदार सुप्रिया सुळे यांना 21 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. यंदा भाजपकडून पुरंदर, दौंड, खडकवासला, शहरालगतचा मुळशी तालुक्‍यातून चांगलीच फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघातील गोळाबेरीज कमी पडल्यास इंदापूरमधून मताधिक्‍य मिळण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. इंदापुरातील मेळाव्यात पाटील यांनी सुळे यांना सहकार्य करण्याचे वक्‍तव्य आणि शंकरराव पाटील यांचा पुतण्या असल्याचे सूचित केल्यानंतर भाजपच्या आशा मावळल्यासारख्या दिसू लागल्या आहेत. मात्र, पडद्याआड वेगळीच गणिते सुरू राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.