बंगालमध्ये राहयचे तर बंगाली आलेच पाहिजे – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची नवी भूमिका

कोलकाता – बंगाल मध्ये राहायचे असेल तर आता संबंधीत व्यक्तीला बंगाली भाषा बोलता आलीच पाहिजे अशी नवी भूमिका आता त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे. त्या राज्यात सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी विविध कारणांवरून आंदोलन सुरू करून राज्य सरकारला त्रस्त करून सोडले आहे. तथापी सरकारच्या विरोधात आंदोलने करण्यासाठीं भाजपने बाहेरून येथे माणसे आणली आहेत असा आरोप ममतांनी सातत्याने केला आहे. हाच मुद्दा लोकांसमोर प्रकर्षाने मांडण्यासाठी त्यांनी आता बंगाली सक्तीची भाषा सुरू केली आहे असे सांगण्यात येते.

आज 24 परगणा जिल्ह्यातील एका सभेत बोलताना त्या म्हणाल्या की आपण जेव्हा दिल्लीला जातो त्यावेळी आपल्याला हिंदी बोलावे लागते. पंजाबात गेल्यानंतर पंजाबी बोलावे लागते. दाक्षिणत्य राज्यांतही त्यांच्याच भाषेचा आग्रह होतो त्यामुळे आपणही बंगालीचाच आग्रह धरला पाहिजे असे त्या म्हणाल्या. बंगालच्या बाहेरून येथे येऊन बंगाली लोकांना मारहाण करणाऱ्याचे प्रकार आपण सहन करणार नाही असेही त्यांनी यावेळी निक्षुन सांगितले. मोदींच्या पक्षाने गुजरात मध्ये दंगलींचे राजकारण केले त्यांना असाच प्रकार आता बंगाल मध्येही करायचा आहे असा आरोप त्यांनी केला.

पश्‍चिम बंगाल मध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने येथील 42 पैकी 18 जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने महत्वाचे पाऊल टाकले आहे. तृणमुल कॉंग्रेसला येथे केवळ 22 जागाच जिंकता आल्या आहेत. गेल्या वेळे पेक्षा त्यांच्या बारा जागा कमी झाल्या आहेत. त्या म्हणाल्या की बंगाल मध्ये बाहेरून मोठ्या प्रमाणात माणसे आणण्यात आली आहेत. ही माणसे मोटारसायकल वर फिरून जागोजागी दहशत माजवत आहेत. बंगाली भाषिक मुस्लिमांच्या घरांवर हे लोक हल्ले करीत आहेत ते सहन केले जाणार नाही असेहीं त्यांनी नमूद केले. या प्रकाराची त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराहीं त्यांनी दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)