पुणे – वादात अडकली तळजाईची मोजणी

पुणे – तळजाई टेकडीवर होत असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामावरून दोन गट पडले आहेत. या गटांच्या वादात महापालिका प्रशासनास या टेकडीची सीमा निश्‍चित करण्यात अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टेकडीच्या आसपास मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असतानाही प्रशासनाला आपल्या ताब्यातील भाग नेमका कोणता हे निश्‍चितच करता येत नसल्याचे चित्र आहे.

तळजाई टेकडीची सुमारे 108 हेक्‍टर जागा आहे. या जागेतील सुमारे 70 हेक्‍टर जागा पालिकेच्या ताब्यात आहे. ही जागा ताब्यात घेताना, महापालिकेकडून त्याची मोजणी करण्यात आली होती. तसेच मार्किंगही करण्यात आले होते. मात्र, या जागेला कोणतीही सिमाभिंत घालण्यात आलेली नव्हती. आता प्रत्यक्ष जागेवर कोणतेही मोजणीचे पुरावे नाहीत तर पालिकेकडे असलेल्या नकाशांमध्ये टेकडीचा कोणता भाग महापालिकेच्या ताब्यात आहे हे स्पष्ट होत नाही. अशातच, या टेकडीच्या काही भागावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यात महापालिकेने तातडीने ही बांधकामे थांबविण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आपल्या ताब्यातील जागेचे मार्किंग करण्याचा निर्णय घेतला असून या मार्किंगची ठिकाणी सिमा निश्‍चितीचे खांब उभारले जाणार आहेत. मात्र, तळजाईवरील बांधकामांमुळे सुरू असलेल्या वादामुळे महापालिकेच्या या मोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांनाही हुसकावून लावण्यात येत आहे. परिणामी टेकडीवरील नेमकी पालिकेची जागा कोणती हे निश्‍चित करणे शक्‍य होत नसल्याचे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

चर्चेतून प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न
या माहितीस महापालिकेच्या अतिरिक्‍त आयुक्‍त रूबल अग्रवाल यांनी दुजोरा दिला आहे. महापालिकेच्या जागेची मोजणी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही मोजणी या ठिकाणच्या विकासकामासाठी असल्याचे वाटत असल्याने नागरिक विरोध करत असल्याचे त्या म्हणाल्या. या टेकडीवर विकासकामे करावीत अथवा नाही यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींची मते जाणून घेण्यात येत असून पर्यावरणप्रेमींची मागणीही विचारात घेतली जाणार आहे. त्यासाठी महापालिका चर्चेने हा प्रश्‍न सोडवित आहे. मात्र, त्या पूर्वी पालिकेची टेकडीची हद्द निश्‍चित होणे आवश्‍यक असल्याचे अतिरिक्‍त आयुक्‍त रूबल अग्रवाल यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.