मुळा नदीमध्ये जलपर्णींची वाढ : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
औंध – बाणेर व बालेवाडी येथे मुळा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णीची वाढ झाली आहे. यामुळे डासांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणाम, परिसरांमध्ये डासाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या डासांवर कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशकाचा प्रभावी परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांची आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने नदीतील जलपर्णी काढून नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
बाणेर व बालेवडी ही गावे नदीच्या काठावर वसलेली आहेत. या भागात पिंपळे निलखला जाणाऱ्या पुलाखाली पाण्याची खोली कमी आहे, त्यामुळे तसेच बाणेर व औंधच्या हद्दीनजीक रोप बांधल्यामुळे जलपर्णी पुढे सरकत नाही. त्यामुळे या भागात नदी हिव्यागार मैदानासारख्या दिसत आहेत. परंतु, या जलपर्णीवर डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे.
या परिसरात वाढलेल्या डासांना मरण्यासाठी नागरिक विविध कंपन्यांचे क्वाईल, लिक्वीड, अगरबत्ती तसेच ईलेक्ट्रिक रॅकेटचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु, डासांवर या कशाचाच परिणाम होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. रात्रीच्या वेळी डासांचे प्रमाण वाढत असल्यामुळे झोप होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.
आरोग्य विभागाचे गोविंद सातपुते यांनी सांगितले की, जलपर्णी काढण्याचे काम कर्मचाऱ्यांमार्फत चालू आहे. बाणेर येथे आधुनिक पद्धतीने जलपर्णी काढण्याचे काम चालू आहे. तसेच रामनदीमधील जलपर्णी 7 ते 8 कर्मचाऱ्यांमार्फत काढण्याचे काम चालू आहे. ज्या ठिकाणी पाण्याचे डबके साठत आहे, अशा ठिकाणी औषध फवारणी करण्यात येत आहे.