नेहमीच्या तुलनेत आवक कमी झाल्याचा परिणाम
पुणे – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फळबाजारात कोकण भागातून मोठ्या प्रमाणावर आंबा विक्रीसाठी येत असतो. मात्र, यंदा महिनाभरापासून मार्केटयार्डात आंब्याची तुरळक आवक सुरू आहे. प्रतिकूल वातावरण आणि आंब्यावर पडलेल्या थ्रिप्स रोगामुळे उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याची आवक कमी झाली आहे. कर्नाटक आंब्याचीही नेहमीच्या तुलनेत निम्मीच आवक आहे. त्यामुळे आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील फळबाजारात दररोज रत्नागिरी हापूस आंब्याच्या सुमारे दीड हजार पेट्यांची आवक होत आहे. कर्नाटक भागातील हापूसची आवक सुरू आहे. सध्या कर्नाटक हापूसची आवक दोन हजार पेट्यांच्या आसपास आहे. रत्नागिरीच्या चार ते आठ डझनाच्या कच्च्या आंब्याच्या पेटीला 1500 ते 3500 रुपये भाव मिळत आहे. तर, तयार हापूसला चार ते आठ डझनाच्या पेटीला 1800 ते 4000 रुपये भाव मिळाला आहे. तयार हापूसच्या पाच ते दहा डझनाच्या पेटीला 2500 ते 5000 रुपये असा भाव मिळाला आहे. किरकोळ बाजारात एक डझन हापूसची 500 ते 800 रुपये भावाने विक्री केली जात आहे.
यावर्षी वातावरणातील बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. निवडणुका, परीक्षा तसेच उन्हाळ्यामुळे आंब्याच्या विक्रीवर सध्या परिणाम जाणवत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाडव्याला आंब्याचे भाव तेजीत असल्याचे रत्नागिरी आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.
कर्नाटक आंब्याची 50 टक्क्यांनी आवक कमी
कर्नाटक आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, कर्नाटक हापूसची आवक गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी पाडव्याला आवक चांगली होती. यंदा कर्नाटकातील आंब्याची आवक जवळपास 50 टक्क्यांनी कमी झाली असून भावात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पाडव्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी कर्नाटकातील आंब्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्नाटक हापूसचे भाव उतरतील. सध्या कर्नाटक हापूसच्या 4 ते 5 डझनाच्या पेटीचा भाव 1500 ते 2000 रुपये आहे. तर, प्रतिडझनाचा भाव 400 ते 500 रुपये आहे. गेल्या दोन दिवसांत तयार आंब्यांना चांगली मागणी राहिली आहे.