कामचुकार कर्मचाऱ्याला “डमी’प्रकरण भोवले

प्रशासनाकडून कारवाई : लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जगतापांची चौकशी किती दिवस…

राष्ट्रीय सुगी पश्‍चात तंत्रज्ञान संस्थेतील महेश दत्तात्रय जगताप यांना वरसोली टोलनाका (ता. मावळ) येथे स्थिर सर्वेक्षण पथकात त्यांची नियुक्‍ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी टोलनाक्‍यावर स्थिर सर्वेक्षण पथकात डमी कर्मचाऱ्याकडे जबाबदारी सोपल्याची घटना ताजी असताना याच संस्थेतील दुसऱ्या कर्मचाऱ्याने हिंमत कशी केली. याच संस्थेतील गुंडेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पण महेश जगताप यांना वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचे परिसरात बोलले जात आहे. त्यांनी या संस्थेतील हजारो झाडे जाळून पर्यावरणाचे अतोनात नुकसान केले तरी त्यांच्यावर कारवाई झाली नसल्याने त्यांच्यावर वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने निवडणूक कामात कसूर करूनही केवळ चौकशी अहवालात प्रकरण अडकले. अद्यापही महेश जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नसल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. निवडणूक विभाग खरच कारवाई करणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वडगाव मावळ  –निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथकात सोमाटणे टोलनाका या ठिकाणी नियुक्‍ती केलेल्या तळेगाव दाभाडे येथील महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या राष्ट्रीय सुगी पश्‍चात तंत्रज्ञान संस्थेच्या सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या यतीन वसंत गुंडेकर यांच्यावर कारवाई केली आहे.

यतीन गुंडेकर या कर्मचाऱ्याने निवडणुकीच्या पथकात काम न करता, जम्मू काश्‍मीर येथे फिरण्यासाठी गेल्याने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये निवडणूक कामात कसूर केल्याने लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे गुंडेकर यांच्यावर गुरुवारी (दि. 4) गुन्हा दाखल करण्यात आला. याच संस्थेतील महेश दत्तात्रय जगताप यांना वरसोली टोलनाका (ता. मावळ) येथे स्थिर सर्वेक्षण पथकात त्यांची नियुक्‍ती करण्यात आली होती.

मात्र त्यांनी टोलनाक्‍यावर स्थिर सर्वेक्षण पथकात डमी कर्मचाऱ्याकडे जबाबदारी सोपवाल्याची घटना ताजी असताना, याच संस्थेतील दुसऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या संस्थेच्या कर्मचाऱ्यांविषयी मावळ तालुक्‍यात चर्चा सुरू आहे. यतीन गुंडेकर यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने यांना सकाळी 8 ते रात्री 8 सोमाटणे टोल नाक्‍यावर स्थिर सर्वेक्षण पथकात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात टोल नाक्‍यावर वाहने तपासणी करून संशयास्पद वस्तू, रक्कम व व्यक्ती तसेच आचारसंहिता आदींबाबत खात्री करून अहवाल द्यायचा असतो.

मात्र यतीन गुंडेकर हे निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथकात कर्तव्य व जबाबदारीने काम न करता जम्मू काश्‍मीर येथे फिरण्यासाठी गेल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रणजीत देसाई यांना मिळाली. त्यांनी आचारसंहिता कक्ष सहायक कक्ष प्रमुख विठ्ठल भोईर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी ते घटनास्थळी नसल्याची खात्री झाली. याशिवाय त्यांचा मोबाईल क्रमांक बंद असल्याने निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याबद्दल लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 प्रमाणे यतीन गुंडेकर यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
करण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.