पुणे – तोलणारांचे धरणे आंदोलन

पुणे – मार्केटयार्डातील भुसार बाजारातील तोलणारांची उपासमार थांबावी, यासाठी हमाल पंचायतीच्या वतीने सोमवारी (दि. 8) पणन संचालकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी, महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता संबंधित बाजार समित्यांना कोणतेही आदेश न करण्याबाबत लेखी स्वरुपामध्ये कळविण्यात येईल, अशी ग्वाही पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी दिली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नितीन पवार, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस हनुमंत बहिरट, गोरख मेंगडे, किशोर भानुसघरे, प्रदिप मारणे, विकास चोरगे आदी सहभागी झाले होते.

डॉ. आढाव म्हणाले, “तोलणारांच्या प्रश्‍नासंदर्भात दि.27 फेब्रुवारी रोजी राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या समोर कलम 43 अन्वये सुनावणी झाली. त्यानुसार सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने पणन संचालकाना राज्यातील तोलणारांची आर्थिक वस्तुस्थिती विचारात घेऊन पणन संचालकांनी 18 डिसेंबर 2014 रोजीच्या परिपत्रकाचा फेरविचार करावा. त्यानंतर आवश्‍यकतेनुसार नवीन परिपत्रक जारी करावे असे आदेश दिला. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने धरणे आंदोलन करावे लागल्याचे डॉ. आढाव यांनी नमूद केले.

याबाबत डॉ. तोष्णीवाल यांच्याशी चर्चा करण्यात आली असून निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर चांगल्या कामासाठी आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये, या उद्देशाने मतदान होईपर्यंत थांबण्याच्या सूचना डॉ. तोष्णीवाल यांनी दिल्या असल्याचेही डॉ. आढाव यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.