पुणे – खोदाई बंद आता रस्ते दुरूस्ती सुरू

बेकायदेशीर खोदाई केल्यास होणार कारवाई

पुणे – महापालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांची खोदाई अखेर बंद करण्यात आली आहे. ही खोदाई करण्यापूर्वी सर्व कंपन्यांना महापालिकेने नोटीस बजाविली असून कोणत्याही कारणास्तव खोदाई केल्याचे आढळल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा या कंपन्यांना देण्यात आला आहे.

महापालिकेकडून शहरात 2 ते 31 मेपर्यंत पावसाळ्यापूर्वीची रस्ते दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील सर्व खोदाई करणाऱ्या कंपन्यांना 30 एप्रिलनंतर खोदाई बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, या कंपन्यांनी काम बंद केले असून पथ विभागाच्या 8 झोनमधून ही खोदाई बंद करण्यात आले आहे की नाही याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, प्रत्येक झोनच्या स्तरावर रस्ते दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ही रस्ते दुरुस्ती करताना दिवसाच्या वेळी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रशासनाकडून हे दुरुस्तीचे काम रात्रीच्या वेळी हाती घेण्यात आले असून रात्री 11 नंतर दुरुस्ती केली जात आहे.

शासकीय कंपन्यांनाही मनाई
महापालिकेकडून यावर्षी शासकीय कंपन्यांनाही खोदाईस मनाई करण्यात आली आहे. त्यात, महावितरण, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड तसेच बीएसएनएल या कंपन्यांचा समावेश आहे. मागील वर्षी एमएनजीएलने राज्य शासनाकडून वेगळी परवानगी आणून 30 मेपर्यंत खोदाईचे काम केले होते. मात्र, यावेळी त्यांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच, केवळ अत्यावश्‍यक कामासाठी महावितरणलाच खोदाईला परवानगी दिली जाणार असून पालिकेच्या पाणीपुरवठा तसेच ड्रेनेज विभागासही ही मुभा असणार आहे. त्या व्यतिरिक्त खोदाई झाल्यास कारवाईचा इशारा महापालिकेने दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.