पुणे – कष्टाच्या भाकरीला मिळेना ‘निवारा’

स्वारगेट येथील झुणका-भाकर केंद्र बंद होणार?

पुणे – स्वारगेट येथील महामेट्रोच्या मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हबसाठी स्वारगेट चौकातील पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन याच परिसरात करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी असलेल्या झुणका-भाकर केंद्र (कष्टाची भाकर)च्या मान्यतेची कोणतीही कागदपत्रे महापालिका तसेच या संस्थेकडेही नसल्याने या केंद्राचे पुनर्वनस नेमके कोणी करायचे आणि त्यांना जागा कोणी द्यायची यावरून वाद निर्माण झाला आहे.

स्वारगेट येथे महामेट्रोकडून मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येत आहे. या हबच्या कामासाठी स्वारगेट चौकातील महापालिकेच्या पाणी पुरवठ्याची जागा देण्यात आली आहे. त्यामुळे या भागात पूलाच्या बाजूला असलेल्या सुमारे 100 पथारींचे आसपासच्या भागात पुनर्वसन करण्यात आले आहे. या व्यावसायिकांच्या नोंदी महापालिकेकडे आहेत. मात्र, त्याचवेळी कष्टकरी नागरिकांनी अल्पदरात झुणका-भाकर, तसेच जेवण पुरविणाऱ्या कष्टाची भाकरचे केंद्र आहे. या केंद्रावर मोठ्या प्रमाणात नागरिक जेवणासाठी गर्दी करतात. मात्र, या संस्थेस जागा दिल्याची कोणतीही नोंद अतिक्रमण विभागाकडे नाही. त्यामुळे अतिक्रमण विभागाने या केंद्राला कारवाईची नोटीस बजावली होती. यावेळी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागात भेट घेऊन पुनर्वसनासाठी जागा देण्याची विनंती केली. तसेच, राज्यात युतीचे सरकार असताना 1995 मध्ये झुणका-भाकर केंद्रांतर्गत राज्य शासनाच्या धोरणानुसारच ही जागा महापालिकेनेच दिली होती, असे सांगण्यात आले.

तसेच, समाज विकास विभागाकडून ही जागा देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अतिक्रमन विभागानेही हात वर केले असून ही जागा मंडई अथवा समाज विकास विभागाने दिलेली असल्यास त्यांच्याकडून पुनर्वसन होणे आवश्‍यक असल्याची भूमिका घेतली आहे. त्याचवेळी, महामेट्रोकडूनही हे केंद्र काढून जागा रिकामे करून देण्याची मागणी केली जात असल्याने अतिक्रमन विभागाचीही अडचण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासकीय गोंधळामुळे कष्टकऱ्यांना सवलतीत जेवण पुरविणाऱ्या या संस्थेवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×