#ICCWorldCup2019 : भारताची आज सराव परीक्षा

विश्‍वचषकापुर्वी न्युझीलंड विरुद्ध पहिला सराव सामना ; चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याची उत्सुकता

सामन्याचे ठिकाण – केनिंग्टन ओव्हल मैदान
वेळ – दुपारी 3 वाजता

लंडन  – विश्‍वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असुन त्या पुर्वीच्या सराव सामन्यांना सुरूवात झाली असुन आज भारतीय संघाचा सराव सामना संभाव्य विजेता म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या न्युझीलंड या संघा बरोबर असणार आहे, त्यामुळे भारतीय संघा समोर सराव परिक्षेत अवघड पेपर असणार आहे.

1992 नंतर प्रथमच विश्‍वचषक स्पर्धेचे स्वरुप बदललेले असुन यंदा ही स्पर्धा राऊंड रॉबीन प्रकारात होणार असुन या मध्ये सहभागी सर्व संघ एकमेकांविरुद्ध सामना खेळतील. विश्‍वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे अभियान 5 जुन रोजी दक्षिण अफ्रिके विरुद्धच्या सामन्यातुन होणार आहे. मात्र, त्यापुर्वी भारतीय संघाचे दोन सराव सामने होतील त्यातील पहिला सामना आज (शनिवार 25 मे) न्युझीलंड विरुद्ध होईल.

विश्‍वचषक स्पर्धा तोंडावर असताना भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावरील फलंदाज अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर नेमका कोणता फलंदाज उतरणार हे देखील पहाणे औत्सुक्‍याचे असणार आहे. कारण, निवडलेल्या भारतीय संघामध्ये चौथ्या क्रमांकावर खेळल्याचा अनुभव फार कमी फलंदाजांकडे आहे. ज्यामध्ये विजय शंकरला सनरायजर्स हैदराबाद संघाकडून चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा अनुभव आहे. तर, दिनेश कार्तिकला कोलकाताच्या संघाकडून या क्रमांकावर फलंदाजीचा अनुभव असल्याने त्या दोघांमध्ये आजच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरण्यात चुरस असणार आहे. तर, या दोघांव्यतिरीक्त संघामध्ये अतिरिक्त सलामीवीर म्हणुन स्थान मिळालेला लोकेश राहुल देखील या स्थानावर फलंदाजीस उतरण्याची शक्‍यता आहे.

विश्‍वचषकापुर्वी या दोन सराव सामन्यांचा उपयोग भारतीय संघाला आपल्या फलंदाजीतील खोली आणि फलंदाज क्रमांक तपासण्या करीता होवू शकेल. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ नेमका कोणत्या खेळाडूंना अंतिम संघात स्थान देतो हे तपासुन पहाण्यास मदत होईल. त्यातच,भारतीय संघातील सर्वच खेळाडू जवळपास 2 महिने टी-20 प्रकारातील क्रिकेट खेळलेले आहेत. त्यामुळे टी-20 प्रकारातुन एकदिवसीय क्रिकेटच्या प्रकाराकडे वळायला देखील हे दोन सराव सामने भारतीय संघाला मदतगार ठरतील.

आजच्या सामन्यात भारतीय संघात सलामीला शिखर धवन आणि रोहित शर्मा येतील तर त्याच्या पाठोपाठ कर्णधार विराट कोहली हा फलंदाजीस उतरेल त्यापाठोपाठ विजय शंकर अथवा लोकेश राहुलला संधी दिली जाईल. तर, यानंतर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव आणि हार्दिक पांड्या उतरण्याची शक्‍यता असुन यानंतर भुवनेश्‍वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहाल आणि जसप्रीत बुमराह फलंदाजीला उतरतील अशी शक्‍यता असुन केदार जाधवच्या ऐवजी संघात जर मोहम्मद शमीचा समावेश केला जाण्याची देखील शक्‍यता आहे.

तर, दुसरीकडे न्युझीलंडचा संघ देखील यंदा लयीत असुन रॉस टेलर, केन विल्यम्सन आणि मार्टिन गुप्टिल गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांना बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना विशेष रननिती आखण्याची गरज आहे. त्यातच इंग्लंड मधील खेळपट्ट्या या फलंदाजांसाठी पोषक अशा बनवल्या गेल्या असल्याने भारतीय गोलंदाजांचा आजच्या सामन्यात विशेष कस लागेल यात शंका नाही.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहाल, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, भुवनेश्‍वर कुमार, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, विजय शंकर, कुलदीप यादव.

न्युझीलंड – केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ट्रेन्ट बोल्ट, कॉलिन डी ग्रॅन्होम, लोकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुन्रो, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिचेल सॅन्टेनर, इश सोधी, टीम साऊदी, रॉस टेलर.

Leave A Reply

Your email address will not be published.