नैसर्गिक मेवा जपणारे आदर प्रतिष्ठान

– हर्षद कटारिया

सहकारनगर म्हणजे पुण्यातील हिरवळीचा भाग सहकारनगर वस्ती संपते तिथे वनखात्याची जमीन सुरु होते. ते जंगल राखीव आहे. पुण्यात सर्वत्र सिमेंटचे जंगले निर्माण होत असताना सहकारनगर सारख्या शांत आणि गर्द हिरव्यागार झाडांनी व्यापलेल्या भागाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाल आहे. सहकारनगर येथील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाताना आपल्याला हिरवाई दिसून येते.त्यात आंबा जांभूळ, फणस आणि कडुलिंबाच्या झाडांची संख्या जास्त दिसत. त्याचबरोबर आजूबाजूच्या सोसायट्या, बंगल्यामध्ये सुद्धा हीच झाडे आहेत. उन्हाळ्यात फणस, आंबा, जांभूळ इत्यादी सर्व फळे आपल्याच घरात, सोसायटीत दिसत असताना उंच वाढलेल्या झाडामुळे ही फळे काढता येत नाहीत. त्याबरोबर ही फळे काढायला माणसे सुद्धा मिळत नाहीत परिणामी ही फळे पिकून गळून पडतात व वाया जातात.हीबाब ओळखून या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी एकत्रित येऊन आदर प्रतिष्ठान स्थापन करुन ही फळे मोफत उतरवून देण्याचा उपक्रम सुरु केला.आज या उपक्रमाला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.झाडावरुन उतरविण्यात आलेली फळे ही आजूबाजूच्या वस्तीतील मुलांना मोफत वाटण्यात येतात.त्यामुळे फळे सुद्धा वाया जात नाहीत आणि मुलांच्या पोटात गेल्याने तो सुद्धा आनंद मिळतो.

अनेकवेळा या परिसरातील रस्त्यावरुन फिरताना आंब्याचा ढीग पडलेला दिसतो तर जांभळांचा सडा पडून रस्ता सुद्धा खराब होतो.त्यातच एखादा पाऊस झाला की मग सगळेच संपते.असा निर्सगाचा वाया जाणारा खजिना कोणाच्या पोटात गेला तर बरा पण वाया जाता कामा नये.लाखो रुपयांचा हा हा नैसर्गिक मेवा जपण्याचे काम या आदर प्रतिष्ठानचे कार्यकते करत आहेत.आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे मुले खरा असा नैसर्गिक मेवा खाणे विसरले आहेत. फास्ट फुडच्या जमान्यात झाडावरुन तोडलेली जांभळे खाणे म्हणजे दुरापास्त होत चालले आहे.अशा मुलांना आता मेवा मिळू लागला आहे.या उपक्रमाची सुरवात करण्यापुर्वी त्यांची संकल्पना मांडली ती या परिसरात राहणाऱ्या बाळासाहेब फडणवीस यांनी. त्यांनी ही कल्पना फडणवीस यांचे मार्गदर्शक राहुल माने यांना सांगितली. त्यांनी या कल्पनेला मुर्त स्वरुप दिले,गेले चार वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.मोफत झाडावरील फळे उतरवून देणार म्हटल्यावर घरमालक किंवा सोसायटी सदस्य सुद्धा आंनदाने आदर प्रतिष्ठानला हे काम देत आहे.गेल्या चार वर्षात सहकानगर तळजाई परिसरातील शेकडो सोसायट्या आणि बंगल्यांमधील झाडांची फळे त्यांनी उतरवली आहेत.त्यांची ही मागणी वाढतच आहे.विशेष करुन महिलांना लोणच्यासाठी कैऱ्या उपलब्ध होत असल्याने त्या जास्त खूष असतात.या प्रतिष्ठानचे कायकर्ते झाडावरील फळे उतरवली की सर्वप्रथम झाडाच्या मालकाकडे ती फळे देतात.मालक त्यातील त्याला हवी तेवढी फळे घेता आणि मग उर्वरित फळे ही वाटली जातात.

Leave A Reply

Your email address will not be published.