निवडणूक आयोगाचा महत्वपुर्ण निर्णय : मोदींवरील चित्रपटाला निवडणूक संपेपर्यंत बंदी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काढण्यात आलेल्या चित्रपटाला निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत हा चित्रपट आता प्रकाशित करता येणार नाही. कोणत्याही राजकीय व्यक्तींवरील चित्रपट निवडणूक प्रचार काळात प्रकाशित करण्यास अनुमती दिली गेली तर प्रचाराची समान संधी बिघडण्याची शक्‍यता असल्याने हा चित्रपट निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत प्रकाशित करू नये अशा भूमिकेत आम्ही आलो आहोत असे आयोगाने म्हटले आहे. इलेक्‍ट्रॉनिक प्रसार माध्यमांवरही या चित्रपटाला वरील कालावधी पर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. प्रसार माध्यमांच्या शक्तीचा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी असा दुरूपयोग करता येणार नाही असा अभिप्रायही आयोगाने नोंदवला आहे.

या चित्रपटाच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल झाली तर त्या तक्रारीची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशामार्फत चौकशी केली जाईल असेही आयोगाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयातही दाखल करण्यात आली होती पण त्यावर कोणताहीं निर्णय देण्यास सुप्रिम कोर्टाने असमर्थता दर्शवली होती. यावर निवडणूक आयोगच निर्णय देऊ शकेल असे कोटाने नमूद केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने आज हा महत्वपुर्ण निर्णय दिला. विवेक ओबेरॉय या अभिनेत्याने या चित्रपटात मोदींची भूमिका केली असून स्वता विवेक ओबेरॉय व चित्रपटाच्या निर्मीती प्रक्रियेतील अनेकजण भाजपशी संबंधीत आहेत असा कॉंग्रेसचा आक्षेप होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.