देशभरात वादळी पावसाचे 50 बळी

राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरातला पावसाचा मोठा फटका

नवी दिल्ली – राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, मणिपुर आणि देशाच्या अन्य भागात काल झालेल्या तुफानी वादळी पावसामुळे किमान 50 जणांचे बळी गेले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. राजस्थानमध्ये सर्वाधिक 21 जणांचे बळी गेले असून मध्य प्रदेशमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय गुजरातमध्ये 10 आणि महाराष्ट्रात तीन जण ठार झाले आहेत. काल रात्री देशाच्या विविध भागात तुफानी वादळ आणि त्याला जोडूनच जोरदार पावसाचा मोठा फटका बसला. त्यात पिकांचेही मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या हाती येत आहेत.

राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वादळी पावसाने गुजरातमध्ये ठिकठिकाणी जी पडझड झाली त्यात किमान दहा जण ठार झाले आहेत. उत्तर गुजरातमध्ये या वादळी पावसाने मोठे नुकसान झाले असून ठिकठिकाणी घरे आणि झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातही झाडे पडल्याने तसेच विज पडल्याने एकूण दहा जण दगावले आहेत. तसेच उदयपुर आणि जयपुरमध्ये प्रत्येकी 4 जणांचे बळी गेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यत तीन जणांचा मृत्यू झाला असून यात नाशिकमधील एका वृद्ध महिला आणि एका तरुणाचा समोवश आहे.

या घटनांच्या संबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रूपयांची मदत घोषित केली असून जखमींना प्रत्येकी 50 हजार रूपये दिले जाणार आहेत. या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्याची सुचना आपण संबंधीत अधिकाऱ्यांना दिली आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.