मी मोदींसारखी खोटी आश्‍वासने देत नाही – वायनाडच्या सभेत राहुल गांधी यांचे प्रतिपादन

वायनाड – मी नरेंद्र मोदी यांच्या सारखी खोटी आश्‍वासने देत नाही. मी तुम्हाला दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असे सांगणार नाही, मी तुमच्या खात्यावर प्रत्येकी पंधरा लाख रूपये भरेन असे आश्‍वासन देणार नाही. पण येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी जे काही करता येणे शक्‍य आहे ते मी करून दाखवेन असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्ष व या पक्षाचे येथील उमेदवार राहुल गांधी यांनी येथील प्रचार सभेत केले.

मी येथे केवळ काही महिन्यांसाठी तुमच्याशी संबंध ठेवण्यासाठी आलेलो नाहीं. मला तुमच्यासाठी आयुष्यभरासाठीचे संबंध ठेवायचे आहेत. मी मन की बात करणार नाही. तुमच्या मन की बात मी ऐकणार आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. वायनाड हे एक सुंदर स्थळ आहे. येथे सर्व धर्माच्या लोकांचे सह अस्तित्व आहे. ते एकमेकांशी सामंजस्याने राहात आहेत. हे एक चांगले उदाहरण आहे.

साऱ्या देशाने वायनाडची ही संस्कृती अवलंबली पाहिजे असा आपला आग्रह राहील. मी जेव्हा दक्षिणेतून निवडणूक लढवण्याचा विचार केला त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा वायनाडचा मतदार संघ आला. वैविध्यपुर्ण संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी घडते. ते मला अधिक भावले असे राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले. मी यावेळी दक्षिणेतूनही निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे कारण दक्षिणेचाही आवाज संपुर्ण देशभर ऐकला जावा असे मला वाटते. त्यामुळे मी केरळ आणि वायनाडची निवड केली असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.