दुष्काळात महिलांची रोजगारासाठी वणवण

बागायती गावांत रोजगारांच्या संधी

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील दुष्काळी गावांतील अनेक महिला रोजगारासाठी घोडनदी काठावरील बागायती गावांत येत आहेत. त्यांना ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जात आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळावे म्हणून आदिवासी आणि सातगाव पठार भागातील महिला कामासाठी बाहेर पडत आहेत.

400 ते 500 महिला नदीकाठच्या बागायती गावात शेतीच्या कामांसाठी मजुरीने येत आहेत. सदर गावांतील 15 ते 20 पिकअप गाड्या महिलांना ने-आण करीत असतात. महिलांबरोबर पिकअप गाड्यांनाही रोजगार उपलब्ध झाला असून एका महिलेला 150 ते 170 रुपये रोज मिळत आहे. सातगाव पठार भागातील पारगाव, पेठ, गंगेवाडी, मनकरवाडी, कोल्हारवाडी, थुगाव, कुरवंडी, भावडी तसेच खेड तालुक्‍यातील जऊळके, वाफगाव या गावातील गरीब घरातील महिला रोजगारासाठी निरगुडसर, जवळे, भराडी, पारगाव कारखाना, पिंपळगाव, कळंब, चांडोली, अवसरी इत्यादी गावांत येत आहेत. काही महिला बाराही महिने मजुरीने जावून घर प्रपंच चालवून मुलांचे शिक्षण करीत आहेत. सातगाव पठारावर या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

बटाटा, ज्वारी, वाटाणा ही पैसे मिळवून देणारी नगदी पिके घेतली जातात. जनावरांसाठी असणाऱ्या शाळु पिकाला चांगली मागणी असते; परंतु पाऊस पुरेसा न झाल्याने येथील शेतकऱ्यांनी दुभत्या गाई विक्रीसाठी नेल्या आहेत. अवसरी, निरगुडसर, पारगाव, गावडेवाडी, मेंगडेवाडी, टाव्हरेवाडी, पिंपळगाव, लाखणगाव, शिंगवे, रांजणी, वळती या भागातून डिंभा उजवा कालवा तसेच घोडनदी पाण्याने बारमाही पाण्याने वाहत असल्याने या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून देणारी नगदी पिके घेत असतात. सदर गावांत महिला मजूर मिळत नसल्याने बाहेर गावाहुन मजूर आणले जातात. तसेच महिलांना ने-आण करणाऱ्या पिकअप गाड्यांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.