क्वालालंपूर -अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची शनिवारी फिफाच्या कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे. या समितीत निवड झालेले पहिले भारतीय म्हणून बहुमान मिळविलेल्या पटेल यांना 46 पैकी 38 मते मिळाली.
आशियाई फुटबॉल संघटनेकडून (एएफसी) पाच सदस्यांची फिफा समितीत निवड झाली. त्यात एएफसीचे अध्यक्ष आणि एका महिला सदस्याचा समावेश आहे. त्याआधी शेख सलमान बिन इब्राहिम अल खलिफा यांना एएफसीचा अध्यक्ष पुन्हा निवडण्यात आले. त्यांचा 2023 पर्यंत कार्यकाळ असेल.
क्वालालंपूरमध्ये एएफसीच्या 29 व्या कॉंग्रेसदरम्यान ही निवडणूक झाली. सदस्यांची निवड 2019 ते 2023 दरम्यान चार वर्षांच्या कालावधीसाठी झाली आहे. पटेल यांच्याशिवाय समितीत अल-मोहन्नदी (कतार), खालीद अवाद अल्तेबिती (सौदी अरब), मारियानो वी. अरनेटा जुनिअर (फिलिपाईन्स), चुंग मोंग ग्यु (कोरिया), दू झोकाई (चीन), मेहदी ताज (इराण) आणि कोहजो तशिमा (जपान) यांची उमेदवारी होती.