दुष्काळनिवारणासाठी पाठपुरावा तोकडा

केंदूर परिसरातील गावांत भीषण सावट

केंदूर- केंदूर (ता. शिरूर) येथील परिसरात यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. यात दुष्काळ निवारण करण्यासाठी लोकप्रतिनिधींना विसर पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केंदूर गाव पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करीत आहे. मात्र, यावेळी दुष्काळ निवारणाची कोणालाही सोयरसूतक नाही. परिसरात तीव्रता वाढत असताना नेते प्रचारात सक्रिय झाले आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता अस्तित्वाची लढाई वाटत आहे. मात्र, जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम सुरू असल्याचे विदारक वास्तव केंदूर परिसरात दिसत आहे/
शिरूर तालुक्‍यातील जिल्ह्यात सर्वाधिक टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासनाच्या आकडेवारीवरून ही संख्या असली तरी नियोजनात अजून कमतरता असल्याचे दिसत आहे. गावात येणारे टॅंकर अपुरे पडत आहेत. जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. पिण्याचे पाणी देखील विकत घ्यावे लागत आहे. खासगी टॅंकरचे दर तर गगनाला भिडले आहे. पाणीटंचाईची झळ असताना आता आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ही परिस्थिती असताना मात्र, लोकप्रतिनिधी प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे नागरिकांतून संतापाचा उद्रेक होत आहे. विरोधकांनी हात झटकले आहेत.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कारभारी लक्ष देत नाहीत. दुष्काळात जनता होरपळत असताना नेमका कोणता उमेदवार पाणीप्रश्‍नावर तोडगा काढू शकतो, याचा अंदाज मात्र मतदार आता लावू शकत नाहीत. पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी केंदूर परिसरातील शेतकऱ्यांनी जनरेटा उभारला आहे. याला दोन ते तीन महिन्यांपूर्वी सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. केंदूरच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना ग्रामस्थांची मनधरणी करण्यात यश जरी आले असले तरी पाणीप्रश्‍न अजूनही ज्वलंत आहे. याचे भान लोकप्रतिनिधींना नाही. येत्या काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत जनता राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देतील, हे मात्र नक्‍की. करंदी, जातेगाव आणि पिंपळे जगताप परिसरात चासकमानच्या कालव्यात पाणी नसल्याने पर्यायाने विहिरींनी देखील तळ गाठला आहे.

आत्तापर्यंत पिकवलेलं पीक आता पाण्याच्या अभावाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परिसरातून चासकमानच्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हाताशी आलेले पीक पाण्याअभावी वाया जाण्याची चिंता आता शेतकऱ्यांना सतावत आहे. दूध व्यावसायिक हैराण झाले आहेत. ओला चारा उरला नाही. जनावरांना पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. पर्यायाने दूध उत्पादन घटले आहे. त्यात दुधाचा बाजार तळाला जात असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

खासगी टॅंकरच्या किमती सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या नाहीत. पिण्याचे पाणी देखील विकत घ्यावे लागत आहे. दुष्काळातील समस्या चोहोबाजूनी घोंगावत येत असताना लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे. किमान चासकामानच्या कालव्यात पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तात्पुरता मार्गी लागू शकतो. मात्र याकडे देखील दुर्लक्ष केले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.