मावळ लोकसभा : अपक्षांना सफरचंद, जहाज आणि मुसळ-खलबत्ताही

मावळ लोकसभा : निवडणूक विभागाकडून चिन्ह वाटप

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी अंतिम मुदत होती. मुदत संपल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उरलेल्या अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. यामध्ये अपक्षांनी सफरंचद, जहार, बॅट, मुसळ आणि खलबत्ता, शेतकरी, नारळाची बाग अशा चिन्हांना पसंती दिली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत अधिकृत पक्षांच्या चिन्हाबरोबरच अपक्षांची चिन्हेही लोकांच्या लक्षात राहणारी ठरणार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 28 पैकी 7 जणांनी माघार घेतली. त्यामुळे, निवडणुकीच्या रिंगणात 21 उमेदवार उरले आहेत. यामधील राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, बहुजन समाज पार्टी या राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे बोधचिन्ह अनुक्रमे घड्याळ, धनुष्यबाण व हत्ती मिळाले.

त्यापाठोपाठ राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्ष वगळून अन्य नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना चिन्हाच्या वाटपात प्राधान्य देण्यात आले. या उमेदवारांनी दर्शवलेल्या पसंदी क्रमांकानुसार उपलब्ध असलेल्या चिन्हाचे वाटप करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला कपबशी, क्रांतीकारी जयहिंद सेनेच्या उमेदवाराला हेलिकॉप्टर, आंबेडकर राइट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराला कोट, बहुजन मुक्‍ती पार्टीच्या उमेदवाराला खाट, भारतीय नवजवान सेनेच्या उमेदवाराला डिश अँटीना, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाला शिट्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या उमेदवाराला एअर कंडिशन हे चिन्ह मिळाले.

यानंतर उर्वरित 11 अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. अपक्षांमध्ये मतदारांच्या ओळखीचे चिन्ह मिळवण्यासाठी चढाओढ पहायला मिळाली. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या 198 मुक्त चिन्हामधून या उमेदवारांच्या पसंतीनुसार चिन्हाचे वाटप अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)