डॉ. अमोल कोल्हेंनी रचला नवीन इतिहास

भूमिपुत्राच्या विजयाने नारायणगावात जल्लोष

नारायणगाव- येथीले भूमिपुत्र आणि शिरूर लोकसभेचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयाने नारायणगाव व वारूळवाडी (ता. जुन्नर) परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना पक्षाचे उमेदवार आणि मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार शिवाजीराव आढळराव यांना चितपट करून मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळवून नवीन इतिहास रचला आहे. डॉ. अमोल कोल्हे यांची जन्मभूमी असलेल्या नारायणगाव येथे गुलाल-भंडारा उधळून आणि फटाके वाजवून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.
जुन्नर तालुक्‍यातून मागील पंचवार्षिक 2014 मध्ये शिवाजीराव आढळराव यांनी देवदत्त निकम यांच्या विरोधात 25 हजार 544 एवढे मताधिक्‍य मिळविले होते. मात्र, या निवडणुकीत जुन्नर तालुक्‍यातील एकूण 2 लाख 98 हजार 891 एवढ्या मतांपैकी डॉ. अमोल कोल्हे यांना 1 लाख 13 हजार 182 एवढी मते आणि शिवाजीराव आढळराव यांना 71 हजार 631 मते मिळाली आहेत. तालुक्‍यातून कोल्हे यांनी 41 हजार 551 एवढे मताधिक्‍य मिळविले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.