डिजीटल व्यवहारांच्या सुरक्षित प्रणालीसाठी आरबीआय प्रयत्नशील – अरूंधती सिन्हा

कोल्हापूर : कागदोपत्री व्यवहार कमी होवून डिजीटल पेमेंट, कार्ड पेमेंटबरोबरच मोबाईल बॅंकिंगच्या मागणीमध्ये झालेली वाढ ही ग्राहकांच्या मागणीबरोबरच काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे आवश्‍यक त्या पायाभूत सुविधांमध्ये बळकटी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आरबीआय एक सुरक्षित प्रणाली तयार करीत आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडीया विभागीय कार्यालय मुंबई येथील सहाय्यक महाव्यवस्थापक अरूंधती सिन्हा यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या बॅंक ऑफ इंडिया अध्यासन आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने “ई-पेमेंट व सायबर घोटाळे’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सिन्हा बोलत होत्या.

अरूंधती सिन्हा म्हणाल्या, नव्या तंत्र प्रगत बॅंकिंग व्यवस्थेचा ई पेमेंट हा भाग असून त्याबाबत जनजागृती करण्याचे काम रिझर्व्ह बॅंकेने हाती घेतले आहे. यासाठी तीन वर्षांचा आराखडा तयार केला असून सुरक्षित, खात्रीशीर, परवडणारी ई देय प्रणाली करीत असताना खर्च घट, स्पर्धावाढ, सोईस्करता व विश्वसनीयता हे चार महत्वाचे घटक आहेत. ग्राहकांना जलदगतीने, सुरक्षितपणे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी ई-पेमेंटची व्यापकता वाढविण्याचे काम सुरू आहे. पुढील काळात अद्यावत तंत्रज्ञानामुळे बॅंकींग आणि वित्त क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होणार आहेत.

देशामध्ये आर्थिक व्यवहार करीत असताना ओटीपीद्वारे प्रमाणिकरण करण्याच्या पध्दती अवलंबल्या जात आहेत. देशभर ही एक अद्वितीय प्रणाली विकसित होत आहे. सुरक्षित आर्थिक व्यवहारांमध्ये जलदता आणण्यासाठी संपूर्ण बॅंकींग उद्योगांसह अन्य पेमेंट सिस्टम ऑपरेटर्संनाही या प्रणालीबाबत सहकार्य करण्याची आवश्‍यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)