-जयदीप नार्वेकर
अलीकडच्या काळात एसयूव्ही मोटारीसाठी भारतीय बाजारपेठ पोषक बनली आहे. रस्ते कामातील सुधारणा, नव्या पिढीची मागणी आणि भारतीयांचे वाढते उत्पन्न या आधारावर एसयूव्ही मोटारींचा बोलबाला होत आहे. पूर्वी एखाद्या शहरात बोटावर मोजण्याइतपत एसयूव्ही मोटारी असायच्या. मात्र, आज एकाच सोसायटीत दहा ते बारा एसयूव्ही गाड्या पार्क केलेल्या दिसतात. प्रारंभीच्या काळात सर्वांत लोकप्रिय एसयूव्ही म्हणून मारुती जिप्सीकडे पाहिले जात होते. ही मोटार केवळ जंगलातच नाही तर खडतर, पर्वतरांगांतही चढण्यासाठी उपयुक्त होती. पूर्वी ठराविक कंपन्यांच एसयूव्ही गाड्यांची निर्मिती करत असत, आता मागणीत वाढ झाल्याने आणि नावीन्यता हवी असल्याने बहुतांश सर्वच कंपन्यांनी एसयूव्हीचे उत्पादन सुरू केले. त्यास भारतीयांनी प्रतिसादही दिला. आता तर एसयूव्ही गाड्यांची रांग लागली आणि दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ, टाटा सफारी डिकोर, होंडा सीआर-व्ही, फोर्ड एंडेव्हेर आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
भारतातील मोटार विशेषतः एसयूव्हीसारख्या गाड्यांचा बाजार हा येत्या दोन-तीन वर्षात 50 लाखांपर्यंत जाईल, असे चित्र आहे. रस्त्याचे रुंदीकरण, एक्स्प्रेस वे, वेगाने चालवण्याचे वेड, परदेशातील गाड्यांचे आकर्षण, किमतीतील लवचिकता या कारणांमुळे एसयूव्ही गाड्यांना पसंती दिली जात आहे. याशिवाय दणकट आणि आकर्षकता या दोन्ही बाजूही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
या आधारावर एसयूव्ही श्रेणीतील गाड्यांना नेहमीच मागणी राहिली आहे. या मागणीने सेदानला मागे टाकले आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात सुमारे 33 लाख गाड्या विकल्या गेल्या होत्या. अर्थात अमेरिका आणि चीनच्या तुलनेत ही आकडेवारी खूपच कमी आहे. त्याचवेळी प्रवासी मोटारीत सर्वाधिक वेग एसयूव्ही गाड्यांचा राहिला. अर्थात, हा वेग सेदानपेक्षा कैकपटीने अधिक आहे.
एका संशोधन अहवालात आगामी काळात देशातील प्रवासी गाड्यांची विक्री दरवर्षी सरासरी साडेसात टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज आहे. या श्रेणीत सर्वांत जास्त विक्री ही एसयूव्ही गाड्यांची असणार आहे आणि तीदेखील 12 टक्क्यांपर्यंत असेल, असे म्हटले आहे. 2017-18 या काळात एसयूव्ही गाड्यांची विक्री ही 7.89 टक्केच राहिली. त्याचवेळी याच काळात 32.8 लाख प्रवासी गाड्यांची विक्री झाली होती. 2018 मध्ये कमर्शियल वाहनांची विक्री 8.32 लाख युनिट राहिल्याचे अहवालात म्हटले आहे.
2023 पर्यंत वार्षिक 5.6 टक्के विकासाचा वेग गृहित धरल्यास आगामी काळात दरवर्षी दहा लाखांपेक्षा अधिक युनिटची विक्री राहील असे चित्र आहे; परंतु अपेक्षेप्रमाणे कमर्शियल वाहनांच्या विक्रीत वाढ झाली नाही. एप्रिल 2020 पासून क्षमतेपेक्षा अधिक मालांची ने-आण करण्यास बंदी घातल्यानेही कमर्शियल वाहनांच्या विक्रीला ब्रेक लागला. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे गाड्यांच्या निर्मितीला वेग येईल. वितरणप्रणालीला देखील हातभार लागेल, असे म्हटले जात आहे. असे असले तरी भारतात काही नामांकित एसयूव्ही गाड्या असून त्या तरुणांपासून उच्चभ्रू मंडळीत लोकप्रिय आहेत. त्यांची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या.
टाटा सफारी : टाटा मोटर्सची पहिली एसयूव्ही मोटार म्हणून टाटा सफारी ओळखली जाते. 1998 रोजी पहिल्यांदा सफारी भारतीय रस्त्यावर धावली. टाटा सफारीची बांधणी अतिशय दणकट असून ती ओबडधोबड रस्त्यावरही सुस्थितीत धावते. वेगवेगळ्या रंगात असणारी सफारीचे इंटिरिअर आणि बाह्य भाग आकर्षक आहे. टाटा सफारी स्टॉर्मी ही एसयूव्ही श्रेणीतील नवीन मॉडेल मानले जाते. रस्ता नसलेल्या ठिकाणी गाडी चालवण्याचा थरारक अनुभव मिळवून देण्यासाठी टाटा सफारीसारखे दुसरे वाहन नाही.
महिंद्रा स्कॉर्पिओ : महिंद्रा कंपनीच्या
सर्वोत्तम उत्पादनापैकी एक स्कॉर्पिओकडे पाहिले जाते. यात एअर बॅग्ज, एबीएस, क्रुझ कंट्रोल, व्हाइस असिस्ट यासारखे फिचर उपलब्ध आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ ही महिंद्राची पहिली एसयूव्ही मोटार आहे. भारतीय बाजारपेठेबरोबरच परदेशातही स्कॉर्पिओने लोकप्रियता मिळवली आहे. महिंद्रा एक्सयूव्ही 500 हे नवीन मॉडेल असून त्यास कार ऑफ इअर आणि बेस्ट एसयूव्ही ऑफ दी इअर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या मॉडेलची रचना स्कॉर्पिओप्रमाणेच करण्यात आली आहे.
फोर्ड एंडेव्हर : फोर्ड एंडेव्हरला भारताबाहेरील बाजारपेठेत फोर्ड एव्हरेस्ट नावाने ओळखले जाते. मध्यम आकाराची एसयूव्ही ही भारतातील लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. पॉवर, स्टाईल, कन्फर्ट आणि सेफ्टी याचे सुंदर मिश्रण आपल्याला एंडेव्हरमध्ये पाहावयास मिळते. सेकंड जनरेशनची नवीन फोर्ड एंडेव्हरने बाजारात दबदबा निर्माण केला आहे.
टोयोटा फॉर्च्युनर : मध्यम आकाराची फॉर्च्युनर ही भारतातील लोकप्रिय एसयूव्ही होय. विशेषत: देशातील बहुतांश नेतेमंडळींकडे फॉर्च्युनर पाहावयास मिळते. कारण नेतेमंडळींना सतत दौरे करावे लागतात आणि तेही लांबपल्ल्याचे. अशा स्थितीत फॉर्च्युनर गाडी सर्वांच्या अपेक्षेला उतरते. लांब पल्ला अतिशय आरामदायी आणि सुरक्षितपणे गाठण्यासाठी फॉर्च्युनरला पसंती दिली जाते. फॉर्च्युनरची रचना दणकट असून ती भारदस्त दिसते. एसयूव्ही श्रेणीत बेस्ट सेलिंग कार म्हणूनही तिचा नावलौकिक आहे.
मित्झुबशी पेजारो : मित्झुबशी मोटर्सची एसयूव्ही पेजारो मोटार लोकप्रिय आहे. शहरातील रस्त्यावर आणि पर्वतरांगांतील खडतर रस्त्यावरही ही अतिशय आरामात जाते. मित्झुबशी आऊटलॅंडर हे आणखी एक एसयूव्ही श्रेणीतील उत्पादन होय.
शेवर्लेट कॅप्टिव्हा : जीएम डेव्हू कंपनीची
शेवर्लेट कॅप्टिव्हा एसयूव्ही ही मध्यम आकाराची मोटार होय. सेदानप्रमाणे चालवण्याचा अनुभव आपल्याला कॅप्टिव्हामध्ये मिळतो. भारतीय हवामान, रस्ते यासाठी कॅप्टिव्हाची निवड अचूक ठरते.
होंडा सीआर-व्ही : होंडाची लहान एसयूव्ही मोटार म्हणून सीआर-व्हीकडे पाहिले जाते. ही मोटार पाच श्रेणीत उपलब्ध असून यात अनेक अत्याधुनिक फिचरचा समावेश आहे. होंडा सीआर व्हीचे फोर्थ जनरेशनची मोटार नुकतीच लॉंच करण्यात आली आहे.
ह्युंडाई सांता फे : मध्यम आकाराची ह्युंडाईची सांता फे ही सेदान मोटारीप्रमाणे आरामदायी अनुभव प्रदान करते. या मोटारीला मागणी वाढल्याने तिचा पुरवठा करण्यास ह्युंडाईला अडथळे आले होते.
मारुती ग्रॅंड व्हिटारा : मारुती ग्रॅंड व्हिटारा ही मारुती सुझुकीची सर्वोत्तम एसयूव्ही मोटार होय. ही भारतात डिझेलवरही उपलब्ध होय.