जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण करणाऱ्यांवर कारवाई करा

शिरूर तालुक्‍यातील छावा प्रतिष्ठानची मागणी

शिक्रापूर-शिरूर तालुक्‍यातील शेकडो एकर पुनर्वसन जमिनीचे बेकायदा हस्तांतरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच दलालांवर फौजदारी कारवाई करून सर्व जमिनी सरकारजमा कराव्यात, अशी मागणी छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निमगाव म्हाळुंगीचे माजी उपसरपंच तेजस यादव यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राव व पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांच्याकडे केली आहे.

शिरूर तालुक्‍यामध्ये गेली अनेक वर्षापासून चासकमान प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या आहेत. आज पर्यंत त्या जमिनींच्या वाटपाचे काम सुरु आहे; परंतु हे वाटप बेकायदेशीरपणे होत असल्यामुळे काही महिन्यांपूर्वीच शिरूर तहसील कार्यालयातील तत्कालीन नायब तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी यांच्यावर जमिनींचे बेकायदेशीर हस्तांतरीकरण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या अनुषंगाने छावा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय व इतर ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी केल्यानंतर स्वतंत्र तक्रार हेल्पलाईन सुरु करण्यात आले; परंतु हेल्पलाईन सुरु करून देखील शेतकऱ्यांना शासन दरबारी हेलपाटे मारावे लागत आहे.

प्रशासकीय अधिकारी व दलाल हे एकमेकांच्या संगनमताने पुनर्वसित जमिनी लाटत आहेत. तसेच या प्रक्रियेत विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासकीय अधिकारी व दलालांवर फौजदारी कारवाई करून सर्व जमिनी सरकार जमा कराव्यात, अशी मागणी छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निमगाव म्हाळुंगीचे माजी उपसरपंच तेजस यादव यांनी केली आहे. याबाबात कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयसमोर स्थानिक शेतकऱ्यांसमवेत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे तेजस यादव यांनी सांगितले आहे.

  • हस्तांतरित जमिनींवर प्लॉटिंग
    शिरूर तालुक्‍यातील अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जमिनी प्रशासकीय अधिकारी व दलाल यांनी संगनमताने बेकायदेशीर हस्तांतरित करून त्या जमिनीवर प्लॉटिंग व्यवसाय सुरु केला आहे. यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व निमगाव म्हाळुंगीचे माजी उपसरपंच तेजस यादव यांनी दिली.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×