“गुरुजी हे वागणं बर नव्हे’

पुढच्या पिढ्यांनी काय आदर्श घ्यायचा?

  प्रशांत जाधव, सातारा.

जिहे-कठापूरच्या पाण्यावरून माणचे राजकारण आधीच तापले असताना गुरुवारी गुरूजींच्या दोन गटांनी आणखी हे वातावरण तापवले. माणदेशातील गुरूजीच्या गटाने सातारा भागातील गुरूजींना बांधून मारहाण केल्याची चर्चा आहे. गुरूजींचा राडा पोलीस ठाण्याच्या दारात पोहोचल्यावर एकमेकांना “बघून घेण्याची’ भाषा करणाऱ्या गुरूजींचे चेहरे काळवंडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

त्यानंतर दोन्ही गटांनी आपापल्या परीने “खादी”चा धावा करून “खाकी”वर दबाव आणत प्रकरण रपाधपा करून काहीच घडले नसल्याचा आव आणत पळ काढला. किरकोळ कारणावरून झालेली ही बडवावडवी म्हणजे “चिपट्याच्या दळणाला पायलीच्या ओव्या गायल्या’सारखी आहे.

त्याचे झाले असे, जिल्ह्यात सध्या गुरूजींच्या बॅंकेचे राजकारण सुरू आहे. या बॅंकेत संचालक म्हणून मिरवणाऱ्यांच्यात व ती संधी हातातून गेलेल्यांच्यात गेल्या काही दिवसापासून कळवंड लागल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात गुरूजींची नक्‍की कोणती संघटना मोठी यावरून सुरू असलेल्या पोराटोरांसारख्या भांडणांनी गुरुवारी पातळी ओलांडली.

गुंडांच्या टोळक्‍यालादेखील लाज वाटेल, असा ड्रामा माणदेशात गुरूजींच्या (यांना गुरूजी म्हणावे का, हा प्रश्‍नच आहे) दोन गटांत सुरू झाला. साताऱ्यावरून खादी घालून गेलेल्या एका गटाला माणदेशात खादी घालून लॅंडमाफिया म्हणून मिरवणाऱ्या गटाने चांगलेच बडवले. नुसते बडवलेच नाही तर झाडाला बांधून बडवल्याने माणदेशी गुरूजींना आभाळ ठेंगणे वाटू लागले होते.

त्यानंतर हे प्रकरण दहिवडी पोलीस ठाण्यात पोहोचले तरी मारणारे व मार खाणारे खाही केल्या शांत होत नव्हते. आपल्याच गावात ठोकाठोकी केल्यामुळे छाती फुगलेल्या माणदेशी गुरूजींनी जणू मणभर ताकद आल्याचा आव आणला होता. या कळवंडीनंतर थेट कृष्णेच्या व कमंडलू नदीकाठांवरून सूत्रे हलल्याने आता आपली बिशाद नसल्याचे लक्षात येताच माणदेशातील गुरूजींनी फोनाफोनीला सुरुवात केली.

आंधळीच्या तलावाकडून त्यांच्या हाकेला प्रतिसाद आला. त्यानंतर दहिवडी पोलीस ठाण्याच्या आवारात कृष्णा, कमंडलू नद्यांच्या पाण्यासोबत आंधळीच्या पाण्याचा संगम झाला अन्‌ तुरुंगात जाणाऱ्या गुरूजींचा रस्ता “खाकी’च्या सल्ल्याने शाळेच्या दिशेने गेला.

जाताना मात्र काळवंडलेल्या गुरूजींच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तर गेल्याच, शिवाय माणदेशी गुरूजींनीही आंधळीच्या दिशेने नजर टाकत झालं गेलं गेलं विसरून जाण्याची विनंती केली.

मात्र, यानिमित्ताने अनेक प्रश्‍न उपस्थित होत असून त्यांची उत्तरे शोधावी लागतील. नेहमी नम्रतेने वागावे, नम्रता हा चांगल्या माणसाचा गुण आहे, असे सांगणारे गुरूजी त्या दिवशी नम्रता कुठे विसरले होते? “विद्या विनयेन्‌ शोभते’ याचा या गुरूजींना विसर पडला होता. रत्नांची खाण म्हणून प्रसिध्दी असलेल्या माणदेशात गुरूजींनी जे नाट्य उभे केले ते कोणत्या संस्कृतीला धरून आहे, याचे उत्तर संबंधित गुरूजन देतील का?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)