कॉंग्रेसची 30 नोव्हेंबरला भारत बचाओ रॅली

मोदी सरकारची धोरणे जनताविरोधी असल्याचा आरोप

नवी दिल्ली : मोदी सरकारची धोरणे जनताविरोधी असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. त्यातून सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाकडून 25 नोव्हेंबरपर्यंत देशव्यापी निदर्शने केली जाणार आहेत. त्या निदर्शनांची समाप्ती 30 नोव्हेंबरला होणाऱ्या भारत बचाओ रॅलीच्या माध्यमातून होईल.

सरकारविरोधी निदर्शनांचे स्वरूप निश्‍चित करण्यासाठी कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक शनिवारी येथे झाली. त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पक्षाचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनता त्रस्त बनली आहे. देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे.

शेतीविषयक समस्या आणि बेरोजगारीत वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी देशभरात जिल्हा आणि राज्य स्तरांवर पक्षाकडून निदर्शने केली जातील. त्या निदर्शनांचा शेवट दिल्लीतील रामलीला मैदानात होणाऱ्या रॅलीद्वारे केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

निदर्शनांवेळी कॉंग्रेसकडून विविध आघाड्यांवर मोदी सरकारला आलेल्या अपयशाकडे लक्ष वेधले जाणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसने आता सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.