ओतूर-येथील श्री चैतन्य काशी विश्वेश्वर संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्रीक्षेत्र ओतूर (उत्तमापूर) ते श्रीक्षेत्र काशी असा 70 दिवस सोहळ्याचे रविवारी (दि. 6) प्रस्थान ओतूर येथून झाले. सकाळी टाळ मृदंगाच्या गजरात पांढरी मारूती मंदिर ते कपर्दिकेश्वर मंदिरापर्यंत पालखीची मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्रातील हा एकमेव काशीला जाणारा पायी सोहळा असल्याची माहिती सोहळ्याचे प्रमुख हभप गंगारामबुवा डुंबरे व गणपत पाटील डुंबरे यांनी दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य विशाल तांबे, ओतूरचे सरपंच बाळासाहेब घुले, सुरेखा जाधव, शरद गाढवे, भगवान घुले, सुभाष काशिद, प्रकाश फापाळे, पाटीलबुवा ढमाले, कौशल्या नायकोडी, कमल नलावडे आदि उपस्थित होते.
सोहळ्याचे हे 15वे वर्षे आहे. सर्व धर्म समभावाचा संदेश तसेच सर्व जाती धर्मात प्रेम व शांतीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने सुमारे 400 वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र उत्तमापूर ते काशी असा 1800 किलोमीटरचा प्रवास सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांनी पायी पूर्ण करून विश्वेश्वराच्या मंदिरात किर्तन केल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे. ओतूर येथे चैतन्य महाराजांची संजीवन समाधी आहे. त्याचे महात्म्य जाणून ओतूरचे माजी सरपंच व वारकरी सांप्रदायांचे जुन्नर तालुकाध्यक्ष गंगारामबुवा डुंबरे यांनी भव्य पालखी सोहळयाची 15 वर्षांपूर्वी स्थापना केली. हा सोहळा 2 मार्च रोजी काशी येथे पोहचणार आहे.