आघाडीत हडपसरच्या जागेचाही वाद ?

पुणे :  आगामी विधानसभेसाठी पुण्यातील आघाडीच्या जागावाटपात हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याचे निश्‍चित झालेले असतानाच; या जागेवरून आघाडीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे . या मतदारसंघात कॉंग्रसची परंपरागत ताकद असून हा कॉंग्रेसकडेच राहावा अशी मागणी या मतदारसंघाचे माजी आमदार आणि राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी थेट पक्षाध्यक्ष सोनीया गांधी तसेच राहूल गांधी यांना पत्र  तसेच या मागणीच्या अनुषंगाने शक्ती प्रदर्शन करण्यासाठी हडपसर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने उद्या ( शनिवारी ) सायंकाळी 5 वाजता मेळावाही बोलविण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच कॉंग्रेसकडूनही सावध भूमिका घेण्यात आली असल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणूका अवघ्या महिन्याभराव येऊन ठेपल्या असल्याने पुण्यातील जागा वाटपांसाठी आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहेत. त्यात वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला राष्ट्रवादीला देण्याचे निश्‍चित झाले असून कसबा, कॅन्टोंन्मेंट तसेच शिवाजीनगर कॉंग्रेसकडे असणार आहे. तर अद्याप पर्वती आणि कोथरूडच्या जागेबाबत दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असून त्याबाबत अंतीम निर्णय झालेला नाही. त्यामुळे ज्या जागा निश्‍चित झाल्या आहेत. त्या जागांसाठी दोन्ही पक्षांच्या इच्छूकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच, आता हडपसर मधील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून हडपसर कॉंग्रेसकडे घेण्याची मागणी केली असल्याने आघाडीच्या जागा वाटपात नवा तिढा उभा राहण्याची शक्‍यता आहे.

काय आहे शिवरकर यांची मागणी
शिवरकर यांनी दिलेल्या पत्रानुसार, हडपसर हा शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे शिरूर लोकसभेत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात किमान 2 मतदारसंघ क़ॉंग्रेसच्या वाटयाला येणे आवश्‍यक आहे. त्यात एक हडपसरही आहे. या मतदारसंघात पक्षाला जनसमर्थन आणि कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे या आधारावर तो कॉंग्रेसकडे असावा त्यामुळे हडपसर कॉंग्रेसकडे राहिल्यास त्याचा अनुकूल परिणाम पक्षाच्या वाढीवर होणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत हा मतदारसंघ सोडू नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

 

     आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येत आहे. त्यामुळे पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार, शहरातील कोणताही मतदारसंघ कोणाच्याही वाटयाला गेला तरी, आघाडी धर्माचे पालन करून त्यानुसार, दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारात आम्ही उतरणार आहोत. त्यामुळे तूर्तास यावर कोणतेही भाष्य करणे योग्य होणार नाही. ही निवडणूक दोन्ही पक्ष आघाडी म्हणूनच लढविणार आहोत. – चेतन तुपे ( शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष)
   —————–
आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतीम असेल. मात्र, कार्यकर्त्यांच्या मागणीचाही आदर असून पक्ष घेईल तो निर्णय अंतीम असेल. त्यानुसार, दोन्ही कॉंग्रसकडून भाजपला रोखण्यासाठी एकत्र प्रयत्न केले जातील- रमेश बागवे ( शहराध्यक्ष, कॉंग्रेस)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here