ठेकेदार बदलल्याने परवान्यासाठीचे संकेतस्थळ अद्यापही बंदच
15 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार
या पूर्वी महापालिका तसेच पोलिसांच्या झालेल्या बैठकीत मंडळाना
5 ऑगस्टपर्यंतच अर्ज करता येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता संकेतस्थळ सुरू होण्यास उशीर होत असल्याने ही मुदत वाढविण्यात येणार असून आता मंडळाना 15 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्यास मुभा देण्यात येणार आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसून अशा मंडळांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
पुणे – सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पोलीस तसेच महापालिकेकडून देण्यात येणारे परवाने या वर्षी गणेशोत्सव सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीच बंद केले जाणार आहेत. त्यामुळे हे परवाने देण्यासाठी 5 जुलैपासूनच मंडळांना ऑनलाइन परवाना देण्यासाठी संकेतस्थळ सुरू करण्याची घोषणा महापालिकेने केली होती.
हे संकेतस्थळ पोलीस आयुक्त कार्यालयाकडून सुरू करण्यात येणार होते. मात्र, त्यासाठी नेमलेला ठेकेदार पोलिसांनी बदलल्याने ही नोंदणी अद्यापही सुरू झालेली नाही. तर नवीन संकेतस्थळ सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालवाधी लागणार असल्याने या प्रशासकीय गोंधळाचा फटका मात्र, गणेशमंडळांना बसत आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून या वर्षीसाठी स्वतंत्र मांडव धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका तसेच शहर पोलिसांची दि.1 जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीत यंदा गणेश मंडळाचे परवाने एक महिना आधीच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच मंडळासाठी एक खिडकी योजना शहर पोलिसांच्या माध्यमातून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता 13 जुलैनंतरही पोलिसांकडून हे संकेतस्थळच सुरू केलेले नाही. याबाबत महापालिकेकडे चौकशी केली असता, “हे संकेतस्थळ पोलिसांकडून विकसित करण्यात येणार होते. मात्र, त्यांच्याकडून अचानक संबधित ठेकेदार बदलल्याने हे संकेतस्थळ सुरू झाले नाही. त्यामुळे दि.15 जुलैपर्यंत संकेतस्थळ कार्यान्वित होऊन मंडळाना ऑनलाइन अर्ज अपलोड करता येतील,’ असे सांगण्यात आले.