लखनौ – उत्तरप्रदेशात शामली येथे मालगाडी रूळावरून घसरल्याच्या घटनेचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या एका वाहिनीच्या पत्रकाराला तेथील रेल्वे पोलिसांनी बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाशी संबंधीत दोन पोलिसांना नंतर निलंबीत करण्यात आले आहे.
अमित शर्मा नावाच्या पत्रकाराने या घटनेच्या संबंधात माहिती देताना सांगितले की आम्ही तेथे वृत्तांकन करीत असताना रेल्वे पोलिसांनी आमच्याशी वाद घातला आम्हाला शिवीगाळ करीत त्यांनी मारझोड सुरू केली. आपल्याला कपडे काढण्यास त्यांनी भाग पाडले आणि त्यांनी नंतर आपल्या अंगावर लघवी केल्याची तक्रारही शर्मा याने केली आहे.
या प्रकरणाची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाल्यानंतर उत्तरप्रदेश पोलिस महासंचालकांनी याची दखलघेत दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबीत केले. पोलिसांनी या पत्रकाराला कोठडीतही डांबले होते. सायंकाळी उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.