लक्षवेधी: सोशल मीडियावरचा ब्रॅंड मोदी

हेमंत देसाई

देशासमोरील मूलभूत समस्यांबद्दलचे मुद्दे बाजूला ठेवून, भावनात्मक विषयांवर प्रचार करून, 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सत्ता संपादन केली. कॉंग्रेससह विरोधी पक्षांच्या पार चिंधड्या उडवल्या. या मानसिक धक्‍क्‍यातून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असोत की तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी वा तमाम पुरोगामी, अद्याप बाहेर आलेले नाहीत. निवडणूक प्रचार व्यूहरचना, जाहीरसभा, नुक्‍कड सभा, घरोघरी जाऊन मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येणे आणि समाजमाध्यमांतील प्रचार व जाहिराती यातही भाजपने इतरांवर मात केली.

लोकसभा निवडणुकींचे मतदान सुरू होण्यापूर्वी तीन दिवसच अगोदर भाजपच्या यूट्यूब चॅनेलवर उज्ज्वला योजना, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया या विषयीचा प्रचार करणारा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. हा प्रचार एका रॅप गीताद्वारे करण्यात आला, ज्यात तरुण बेभान होऊन नाचत होते. प्रत्येक वर्गाला अपील होईल, अशा प्रकारचे व्हिडीओ भाजपने प्रदर्शित केले. मैं भी चौकीदार, मोदी है तो मुमकिन है, मेरा पहला मत मोदीजी को, फिर एक बार मोदी सरकार अशा प्रकारच्या आकर्षक प्रचार खेळ्या भाजपने केल्या. छोटे छोटे व्हिडीओज, मीम्स आणि जीआयएफ्स याद्वारे प्रभावी प्रचार करण्यात आला. 2014 मध्ये देशातील इंटरनेट वापरदारांची संख्या 25 कोटी होती, ती आता 52 कोटी झाली आहे. गेल्या पाच वर्षांत समाजमाध्यमांच्या वापरात 155 टक्‍के वाढ झाली आहे. भाजपने डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर 20 कोटी रुपये खर्च केले आणि फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर व यूट्यूबवर अक्षरशः करोडो अनुयायी निर्माण केले. खेरीज, नमो ऍप, नमो चॅनेल हे होतेच. तसेच हजारो डिजिटल सैनिक व्यक्‍तिगतरीत्या भाजपचा प्रचार करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तसेच भाजपच्या समाजमाध्यमांचे 14 कोटी अनुयायी आहेत. तर कॉंग्रेस व राहुल गांधी यांचे केवळ सव्वादोन कोटी. ट्विटरवर भाजप दररोज तरुणांना खेचून घेणारे मुद्दे पसरवत होती, तर व्हिडीओ आणि मिम्ससाठी फेसबुकचा मंच वापरून, ते शेअर होतील याचीही काळजी घेतली जात होती. व्हॉट्‌सऍपचे लाखो ग्रुप्स तयार करण्यात आले. जे पक्षामध्ये नाहीत, ते पक्षात यावेत यासाठी या ग्रुप्सचा उपयोग करून घेण्यात आला. अभिनेता अक्षयकुमारने मोदीजींची टेलिव्हिजनसाठी मुलाखत घेऊन, त्यांची मवाळ प्रतिमा जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला. भारतात ऑनलाइन व्हिडीओज बघण्याचा सरासरी वेळ दररोज 67 मिनिटांपर्यंत गेला आहे. हे लक्षात घेऊन भाजपने “उरी’मधील “हाऊ इज द जोश’ या संवादाचाही वेगवेगळ्या व्हिडीओंमध्ये उपयोग करून घेतला.

या सर्व पार्श्‍वभूमीवर, एका न्यूज चॅनेलवरील पत्रकार सोनाली शिंदे यांनी “पॉलिक्‍लिक, मत तुमचं मेंदू कुणाचा’ हे छोटेखानी पुस्तक लिहिले असून, त्यात निवडणुका व प्रसारमाध्यमे यांचा वेध घेण्यात आला आहे. पुस्तक निवडणुकीच्या अगदी तोंडाशी आले असल्यामुळे, त्याचा रेलेव्हन्स वाढला आहे. 10 मार्च 2019 रोजी नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद झाली, तेथे लेखिका स्वतः हजर होती. मागच्या निवडणुकीत तब्बल 8,252 उमेदवार होते आणि त्यापैकी 668 महिला होत्या. लेखिकेने ही पत्रकार परिषद आपल्या चॅनेलसाठी मोबाइल जर्नालिझमद्वारे (मोजो) कव्हर केली.

आयफोनसारख्या मोबाइलमध्ये दर्जात्मक व्हिडीओ व फोटोशूट होते. त्यालाच चॅनेलचा बूम म्हणजे माईक लावला, की काम तमाम. निवडणूक आयुक्‍त सुनील अरोरा पत्रकार परिषदेस संबोधित करत असताना, त्याच वेगाने हातातल्या मोबाइलवर वार्ताहर महत्त्वाचे मुद्दे टाईप करत होते. यावेळी काही राज्यांत कारण नसताना निवडणुकांचे टप्पे वाढवले आहेत, तर गरज आहे तिथे हे टप्पे नाहीत, अशा थेट शंका पत्रकार निवडणूक आयुक्‍तांना विचारत होते. “किती ताकद आहे या लोकशाहीत’, अशी टिप्पणी लेखिकेने केली आहे. या पुस्तकात वार्तांकन करण्याच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली आहे.

पूर्वी न्यूज चॅनेलसाठीची बातमी म्हटली, की त्याला रिपोर्टर, कॅमेरामन, कॅमेरा, लाईट, ट्रायपॉड, ओबी व्हॅन, ओबी व्हॅनचा तंत्रज्ञ अशी सगळी यंत्रणा लागायची. कालांतराने ओबी गेल्या आणि त्याऐवजी लाइव्ह युनिट आले. मोजो पत्रकारितेत तर मोबाइलने बातमी कव्हर केली जाते. त्यामुळे कॅमेरामनविना रिपोर्टरच ओबी वा लाइव्ह युनिटशिवाय बातमी कव्हर करू शकतो.

केवळ शब्दच नाही, तर व्हिडीओ, फोटो, व्यंगचित्रे याद्वारे राजकीय नेते कल्पक प्रचार करू लागले आहेत. मंजुल, सतीश आर्यप्रभृतींची व्यंगचित्रे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. राजकीय व्यक्‍तींच्या पत्रकार परिषदा फेसबुक लाइव्ह केल्या जातात. अशी सर्व माहिती लेखिकेने दिली आहे. “ताई-माई-अक्‍का ते फेसबुकवर सभा’, या प्रकरणात निवडणूक प्रचाराचे तंत्र कसे बदलत गेले, हे विशद करण्यात आले आहे. पंडित नेहरूंनी प्रांतिक निवडणुकांत घोड्यावरून, बोटीतून, उंटावरून, चालत असा प्रचार केला होता. तर आता छापील जाहीरनाम्यांचा प्रवास पीडीएफ यांच्यामार्फत, फेसबुक, वेबसाईट, ट्विटर, व्हॉट्‌सऍपपर्यंत झाला आहे.

मोदी हे भारताचे पहिले “सोशल मीडिया पंतप्रधान आहेत’, असा मथळा ब्रिटनमधील फायनान्शियल टाइम्सने दिला होता. 2013-14 मध्ये मोदी ब्रॅंड सोशल मीडियामुळे शक्‍य झाला. भाजपने सोशल मीडिया सेल बनवला. अब की बार मोदी सरकार, अच्छे दिन, चायवाला पंतप्रधान, विकासपुरुष हे शब्द प्रत्येक पोस्टमार्फत वापरण्यात आले. मोदी हे सोशल मीडियावर ओबामानंतरचे दुसऱ्या क्रमांकावरील राजकीय नेते ठरले. एखाद्या देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशातील पंतप्रधान वा राष्ट्रपती यांची भेट घेतात. पण मोदींनी अमेरिकेच्या दौऱ्यात फेसबुकचा मार्क्‍स झुकेरबर्ग व गुगलचे सुंदर पिचाई यांची भेट घेतली. आता माध्यम मालक राजकीय पक्षांचे आणि राजकीय पक्ष माध्यम मालकांचे हितसंबध कुरवाळताना दिसत आहेत.

मोदींनी यावेळी आपल्या भाषणातून पाकला इशारा दिला होता आणि भारतातल्या सोशल मीडियावर अकाउंट असलेल्या जवळपास प्रत्येकाने पाकिस्तानचा निषेध केला होता, याकडे सोनाली शिंदे यांनी लक्ष वेधले आहे. कॉंग्रेसवाले जेव्हा भूतकाळात वावरत होते, तेव्हाच, म्हणजे 2002 साली मोदींनी आपली वेबसाइट सुरू केली होती. पुढे प्रशांत किशोर, ओ अँड एम या जाहिरात एजन्सीचे कार्यकारी अध्यक्ष पीयुष पांडे, तसेच इंडिया वर्ल्ड डॉट कॉम या कंपनीचे प्रमुख राजेश जैन प्रभृतींची मदत घेऊन, मोदींनी प्रचार केला. इंटरनेटवरील जोरदार प्रचारानेच त्यांची 2014 साली प्रतिमा घडवण्यात आली आणि 2019 मध्ये त्याची पुनरावृत्ती झाली. या ब्रॅंड मोदीने ब्रॅंड राहुल गांधीला अनेक कोस मागे टाकले. केवळ पॉलिक्‍लिक या पुस्तकातच नव्हे, तर भारतातील निवडणुकांविषयीच्या अनेक इंग्रजी पुस्तकांतूनही याबाबतची मौलिक माहिती मिळते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)