“साहेब, कुत्र्यांचा उच्छाद थांबवा’

नागरिक वैतागले : तीन लाख भटक्‍या कुत्र्यांचा शहराला विळखा

आधी अस्वच्छता थांबवा

विशेषत: ज्या भागात गलिच्छपणा आहे, त्या भागात या कुत्र्यांचा वावर अधिक आहे. उदा. मंगळवार पेठेतील जुना बाजार भागात रात्रीच्यासुमारास सुमारे 25 ते 30 कुत्री टोळीने रस्त्यावर फिरतात. ही कुत्री वाहनचालकांवर धावून जाणे हे रोजचेच झाले आहे. त्यामुळे अनेकदा अपघातही होत आहेत. हा परिसर पालिकेपासून जवळच आहे. तेथेच पोलीस चौकीदेखील आहे. पण, या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची कोणतीही जबाबदारी कोणीही घेत नाही. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. अशीच स्थिती अनेक उपनगरांत आहे.

पुणे – शहरात भटकी कुत्री किती? याची आकडेवारीच महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसून, गेल्या सहा वर्षांत ती ढोबळमानानेच सांगितली जात असून, एवढ्या वर्षांत त्यांची गणनाच झाली नसल्याचे वास्तव उघडकीला आले आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये या कुत्र्यांची मोठी दहशत असून ऐन पावसाळ्यात कुत्री अंगावर येण्याचे प्रमाणही वाढले आहे.

“शहरात लाख-दीड लाख कुत्रे आहेत,’ असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या तीन लाखांवर गेली आहे. ही संख्या नियंत्रणात आणण्यात महापालिका सपशेल “फेल’ ठरली आहेच परंतु त्यांची नेमकी संख्याही प्रशासनाला ठाऊक नाही हे दुर्दैव आहे.

भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका नसबंदी, लसीकरण यासारख्या उपाययोजना करते. त्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूदही केली जाते. असे असतानाही ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विषयावर महापालिका मुख्यसभेतही अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मात्र त्याचा काहीही परिणाम प्रशासनावर झाला नाही.

प्रशासन कडून 6 वर्षा पूर्वी भटक्‍या कुत्र्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते, तेव्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार भटक्‍या कुत्र्यांची संख्या 50 हजार होती, मात्र ती आता तब्बल तीन लाखांपर्यंत पोहोचली आहे. भटक्‍या कुत्र्यांचा योग्य आकडा नसल्यामुळे दर वर्षी केवळ काही हजारच कुत्र्यांची नसबंदी केली जात आहे. त्यामुळे भटक्‍या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

कुत्र्यांना पकडण्यापासून ते शस्त्रक्रिया करून सोडून देण्यापर्यंत प्रत्येक कुत्र्यांवर 600 ते 700 रुपये खर्च येतो. मात्र इतका खर्च करून देखील भटक्‍या कुत्र्याची समस्या वाढतच असून महापालिका प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे भटक्‍या कुत्र्याची संख्या रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

भटक्‍या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर उपाययोजना करण्यात येत आहे. नसबंदी ऑपरेशन करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या यंत्रणेत वाढ करण्यात येत आहे.

– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, मनपा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)