सातारा- महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर फरारी झालेल्या अमोल विजय देशमुख (रा. गोळीबार मैदान, सातारा) या संशयिताला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. देशमुख याच्यावर साताऱ्यात खासगी सावकारीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या टोळीला “मोक्का’ लावल्यानंतर तो फरारी झाला होता.
याबाबत माहिती अशी, खासगी सावकरीप्रकरणी सातारा शहरातील खंड्या धाराशिवकर, विजय देशमुख व इतरांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या टोळीवर 3 फेब्रुवारी 2018 रोजी “मोक्का’ची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून देशमुख फरारी होता. तो नाव बदलून भिगवण (जि. पुणे) येथे वावरत होता.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने भिगवण येथे सापळा लावून त्याला अटक केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, अंमलदार अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, जोतिराम पवार, गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी ही कारवाई केली.