रोड शो की “फ्लॉप’ शो?

-मतदार राजा निरुत्साही ः हलत्या हातांना स्मित हास्याचाही प्रतिसाद नाही
-स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गमावलेली “पकड’ होतेय उघड

पिंपरी – आकाशातून सूर्य आग ओकत असताना… रणरणत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असताना… झुकलेल्या खांद्यांनी समर्थक मागे-मागे हिंडत असताना… उमेदवार रॅली म्हणा अथवा “रोड शो’चे घाट घालत आहेत. निवडणुकीसाठी मोजकेच काही दिवस उरले आहेत. विजयाचे दावे दोन्हीकडून होत असले तरी शाश्‍वती मात्र कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नाही. अशा परिस्थितीत मतदार राजाशी थेट संपर्क करण्याचे अंतिम अस्त्र दोन्ही मुख्य उमेदवारांनी उपसले आहे. परंतु निवडणुकीच्या रणांगणात हे अस्त्र ही प्रभावहीन ठरत असल्याने राजकीय नेते मंडळींची चिंता वाढली आहे.

अवघ्या चार दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यात तिसऱ्या टप्प्यात घसरलेल्या मतदानाच्या टक्‍क्‍याने राजकीय मंडळींना चांगलाच घाम फोडला आहे. मतदानाच्या टक्‍केवारीवरुन पूर्वी बांधले जाणारे अंदाज आता लागू पडतील असे नाही. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा उमेदवार प्रयत्न करत आहे. मतदार संघ खूप मोठा आणि मतदारही 22 लाखांहून अधिक आहेत.

अशा परिस्थितीत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी मोटरसायकल रॅली, पदयात्रा अशा “रोड शो’चा उमेदवारांना आधार घ्यावा लागत आहे. परंतु असे “रोड शो’ सध्या “फ्लॉप शो’ ठरत आहेत. एक उमेदवार विद्यमान खासदार आहे तर दुसरा उमेदवार थेट माजी उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा. या दोन्ही हेवीवेट उमेदवारांकडे पाहिल्यास त्यांच्या मागे मोठी गर्दी दिसणे अपेक्षित आहे. परंतु याच्या उलट घडत आहे. मोजके पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनासोबत घेऊन या उमेदवारांना लोकांपर्यंत जावे लागत आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गमावला जनाधार?

लोकसभेसारखी मोठी निवडणूक कोणताही उमेदवार हा आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या जोरावर लढत असतो. प्रत्येक भागात आपल्या पक्षातील आजी-माजी नगरसेवक, संघटनेतील पदाधिकारी आपल्यासाठी काम करतील आणि गर्दी गोळा करतील अशी उमेदवारांना अपेक्षा असते. परंतु सध्या उमेदवारांचा मोठा अपेक्षाभंग होत आहे. दोन्ही मुख्य उमेदवारांच्या मागे किमान अर्धा डझन पक्षांची युती किंवा आघाडी आहे परंतु लोक मात्र दिसत नाहीत. स्थानिक पदाधिकारी आपले कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उमेदवारांच्या मागे उभे करण्यात अयशस्वी ठरताना दिसत आहेत. एरव्ही मोठ-मोठ्या गप्पा मारणारे आणि मोठ-मोठी पदे घेऊन बसलेल्या पदाधिकाऱ्यांची सध्या मोठ्या प्रमाणात पोल-खोल होताना दिसत आहे.

अपेक्षित प्रतिसाद नाही

दोन दिवसांच्या अंतरानी सांगवी परिसरात दोन्ही पक्षांच्या वतीने रस्त्यावर उतरुन प्रचार करण्यात आला. परंतु दोन्ही रॅली अथवा रोड शोंना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अगदी मोजकी वाहने, मोजके कार्यकर्ते सोबत घेऊन लाऊडस्पीकरवर गाणी लावून या रॅली उरकून घेण्यात आल्या. जयघोष, नारेबाजी खूपच फिकी पडलेली दिसली. एवढेच नव्हे तर नेत्यांनी जनता जनार्दनाकडे पाहून प्रेमाने उंचावलेल्या हातांना साध्या स्मित हास्याचा देखील प्रतिसाद मिळत नव्हता. पदे आणि “पॉवर’ देऊनही आपल्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच परिसरात पकड गमावली असल्याचे नेत्यांच्या यावेळी ध्यानात आले नसावे तर नवलच. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात येत असलेले हे अनुभव उमेदवारांना भेदरवून टाकणारे आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)