पाऊस उशिराने; पेरणीची घाई नको!

पुणे – मे संपत आला, तरी अद्याप अंदमानात दाखल न झालेल्या मान्सूनची वाटचाल यंदा संथ राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातसुद्धा तो उशिरा दाखल होण्याची शक्‍यता आहे. मान्सूनच्या होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही घाई न करता हवामानाचा खात्याकडून आलेल्या अंदाजानुसारच शेतीची कामे करावीत, असे आवाहन कृषी खात्या च्यावतीने करण्यात आले आहे.

साधारणत: 20 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होतो. त्यानंतर 1 जूनपर्यंत तो केरळात येतो आणि 8 जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा मात्र हे वेळापत्रक बदलणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. मान्सून अंदमानात पोहचला असला, तरी अजूनही अंदमानातील काही भाग त्याने व्यापलेला नाही. हा उर्वरित भाग दाखल होण्यासाठी साधारणत: 28 ते 29 मे उजडणार आहे. त्यानंतर तो केरळात दाखल होण्यासाठी 6 जूनपर्यंत वाट पाहवी लागणार आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्‍यता सध्या तरी दिसत नाही. त्याचबरोबर मान्सूनपूर्व पावसाची सुद्धा हजेरी लागेल, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाची घाई करू नये. राज्यात मे अखेरपर्यंत तापमानाचा पारा चढाच राहणार असून जूनमध्ये तो कमी होण्यास सुरूवात होईल. त्यामुळे थोडा दिलासा मिळणार असला, तरी पावसासाठी मात्र वाट पाहावी लागणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, शेतकऱ्यांनी शेतीची पेरणीपूर्व कामे सुरू करावीत. मान्सून उशिराने दाखल होणार असला तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये. मशागतीची कामे पूर्ण करावीत आणि हवामानाच्या सल्ल्यानुसारच पुढचे नियोजन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here