मावळात पार्थ पवारांचा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी

पिंपरी – अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांचा अतिशय दारुण पराभव झाला. विजय होणारच असा ठाम विश्‍वास असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हा पराभव जिव्हारी लागला आहे. एवढ्या मोठ्या फरकाने पार्थ पवार पराभूत होवूच शकत नाहीत, असा विश्‍वास व्यक्‍त करत आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी “ईव्हीएम’वर संशय घेण्यास सुरुवात केली आहे.

प्रत्येक बुथ वाईज मतदानाचे नियोजन केल्यानंतरही सव्वा दोन लाखांच्या फरकाने पार्थ पवार यांचा पराभव झाला. अनेकांना अद्यापही निकालावर भरोसा वाटत नसल्याने पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर खापर फोडले जात असून अनेक जण ईव्हीएमवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आहेत. मागील काही वर्षांपासून विरोधक प्रत्येक पराभवात “ईव्हीएम’वर शंका उपस्थित करतात. “ईव्हीएम’मध्ये फेरफार होऊ शकतो, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाल्याने निवडणूक आयोगाने यावेळीपासून व्हीव्हीपॅट मशीनद्वारे मतदारांना मत कोणाला दिले हे पाहण्याची व्यवस्था केली. मात्र, त्यानंतरही “ईव्हीएम’वर संशय घेण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.

मावळ मतदारसंघात प्रथमदर्शनी चुरशीची वाटत असलेली लढाई शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी एकतर्फी जिंकली. महत्त्वाची बाब म्हणजे 2014च्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍याने आणि एकाही फेरीत मागे न पडता अगदी सहज बारणे यांचा विजय झाला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांचा मोठ्या अंतराने पराभव झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे, अनेकजण या निकालावर विश्‍वास ठेवायला तयार नाहीत.

स्वतः अजित पवार यांनी निकालापुर्वीच “ईव्हीएम’मध्ये गडबड असण्याची शक्‍यता साफ नाकारत “ईव्हीएम’वर विश्‍वास दाखवला होता. परंतु आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मात्र “ईव्हीएम’वर संशय येऊ लागला आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजागे वाघेरे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना आपल्याला वैयक्‍तिक स्तरावर “ईव्हीएम’बद्दल शंका वाटत असल्याचे सष्ट केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पराभवाचे खापर “ईव्हीएम’च्या माथी फुटत असून वातावरण तापू लागले आहे. “ईव्हीएम’वर संशय व्यक्‍त करण्यामागचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे मताधिक्‍य असल्याचे सांगितले जात आहे. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आणि राजकीय विश्‍लेषक येथे “कांटे की टक्‍कर’ असल्याचे म्हणत होते. परंतु निकाल आले तेव्हा मात्र कुठेही टक्‍कर पहायला मिळाली नाही. यामुळे संशय अधिकच बळावत चालला असून कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मात्र या दुर्देवी पराभवाचे खापर इव्हीएमवर फोडू लागले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)