पुण्याच्या “टक्‍क्‍या’ने मावळात भीती

अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला ः मतदान वाढविण्याचे आव्हान

पिंपरी – लोकसभा निवडणुकीत पुण्यात झालेल्या निचांकी मतदानामुळे हा लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. पुण्यातील घसरलेल्या टक्‍क्‍याने मावळ लोकसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांची आणि उमेदवारांची चिंता वाढवली आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनाजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, तरीदेखील या दोन्ही मतदार संघांमध्ये अपेक्षित मतदान होईल का नाही, याची धास्ती निवडणूक अधिकाऱ्यांना आहे.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशाचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होत आहे. लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले जात आहे. मतदानात सहभागी होण्यासाठी दिव्यांग, नवमतदार यांना आवाहन केले जात आहे. दिव्यांग मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याचे पाणी आणि मदतीसाठी स्वयंसेवकही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली मतदार जनजागृती रॅलीदेखील काढल्या जात आहेत. तसेच सायकल रॅलीचे आयोजन करुन खेळाडूंचा देखील सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

यंदा निवडणूक आयोगाने हा टक्का वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. त्याकरिता जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. मतदारांनी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडावे, याकरिता कंपन्या व विविध आस्थापनांमधील कामगारांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश कामगार विभागाने दिले आहेत. ही सवलत देणे शक्‍य नसल्यास मतदानासाठी किमान दोन तास कामावर उशिरा येण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मतदान कमी होण्याची कारणे

पुण्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरीक बाहेर पडणे टाळत आहेत. त्यात एवढ्या उकाड्यात रांगेत उभारण्यास देखील नागरीक तयार होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे निरुत्साह जाणवत असल्याने त्याचा परिणाम थेट मतदानावर होत आहे. त्याशिवाय दुपारच्या सत्रात बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या रोडावल्याचे चित्र दिसते. तर अनेक जण मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून एन्जॉय करत असल्याचे देखील समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)