पुणे – मार्गदर्शक सूचनांनुसार प्रक्रिया पार पाडावी – डॉ. दीपक म्हैसेकर

शिरूर, मावळ मतदारसंघातील निवडणुकीची तयारी

पुणे – निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करून निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी दि.29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक हरी किशोर, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग, मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्‍त डॉ. म्हैसेकर यांनी यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये ज्या-ज्या अडचणी आल्या होत्या, त्याचा अभ्यास करून याबाबत खबरदारी घेण्यात यावी, असे सांगितले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी निवडणूक विषयी लागणारे आवश्‍यक साहित्य तपासून वेळेवर ताब्यात घेऊन त्याचा अहवाल तत्काळ द्यावा, नियोजित वेळेतच आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचावे. मतदानस्थळावर पोहोचताना काही अडचणी आल्यास तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करावा, काही समस्या आल्यास त्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा, मतदानपूर्व व प्रत्यक्ष मतदानादिवशी घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मावळ लोकसभा निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना स्वत:च्या कामाची जबाबदारी सांभाळून त्यांच्या सहाय्यकांना मदत करावी लागते, असे सांगून सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी ठरवूर दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, सर्व प्रकारचे अहवाल, प्रपत्रे विहीत वेळेत भरून त्याची माहिती तत्काळ देण्यात यावी. मतदारांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रकारच्या सूचना करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

पोलीस अधीक्षकांच्या अधिकाऱ्यांना सूचना
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मतदानादिवशी मतदानकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील सर्व आस्थापना बंद राहतील याकडे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, तसेच परिसरामध्ये खासगी वाहने नेऊ देवू नये. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या दंडात्मक कार्यवाहीच्या अधिकाराबाबत सजग रहावे व काही गोंधळाची परिस्थिती आल्यास नजीकच्या पोलीस अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधावा, अशा सूचना पाटील यांनी यावेळी दिल्या.

“शिरूर, मावळसाठीही नियोजनबद्ध काम होईल’
पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम केले. त्यामुळे कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. त्याचप्रमाणे शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातही असेच नियोजनबद्ध काम होईल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या वापरासंबंधी देण्यात आलेल्या प्रशिक्षणाची उजळणी घेतली. यावेळी निवडणूक प्रक्रियेमध्ये क्षेत्रीय अधिकारी हा महत्त्वाचा घटक आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. मॉकपोलच्या दरम्यान निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत चर्चा केली. मतदान केंद्रामध्ये गर्दी होऊ देऊ नये, मतदान केंद्रात मतदारांना मोबाइलचा वापर करू न देणे, उर्वरित कालावधीमध्ये मतदान स्लीपांचे वाटप करावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अजिबात आपले लक्ष विचलीत होऊ न देता तांत्रिक बाबींसंदर्भात दिलेल्या प्रशिक्षणामधील सूचनांप्रमाणेच कार्यवाही करावी. दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी पाठवावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांचे त्यांनी काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)